Join us

प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराला दोन आठवड्यात सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वडाळा पोलीस कोठडी मृत्यू प्रकरणातील महत्त्वाचा व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अनिकेत मिश्रा याला हजर करण्यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वडाळा पोलीस कोठडी मृत्यू प्रकरणातील महत्त्वाचा व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अनिकेत मिश्रा याला हजर करण्यासाठी उच्च न्यायालयाने पोलिसांना दोन आठवड्यांची मुदत दिली.

२७ ऑक्टोबर २०१९ रोजी वडाळा ट्रक टर्मिनल पोलिसांच्या ताब्यात असलेल्या विजय सिंग याचा मृत्यू झाला आणि अनिकेत मिश्रा हा विजय सिंगचा मित्र आहे. पोलीस कोठडी मृत्यूप्रकरणी विजयचे वडील ह्रदय सिंग यांच्यासोबत अनिकेत मिश्रा यानेही न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वडाळा टी.टी. पोलीस ठाण्यात विजयबरोबर घडलेल्या घटनेचा साक्षीदार मिश्रा आहे. मिश्रा घटनास्थळी उपस्थित होता. मात्र, त्या रात्री काय घडले, याबाबत मिश्रा याचा जबाब तपास यंत्रणेने नोंदविलेला नाही. एक वर्षापासून अनिकेत मिश्रा फरार आहे.

ऑगस्ट २०२० मध्ये झालेल्या सुनावणीत न्यायालयाला सांगण्यात आले की, या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अनिकेत मिश्रा हा गेल्या एक वर्षापासून गायब आहे. पोलिसांच्या धमक्यांना घाबरून तो फरार झाला आहे.

दरम्यान, काही दिवसापूर्वी झालेल्या सुनावणीत सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, मिश्रा त्याच्या गावी उत्तर प्रदेशला गेला आहे. त्याने गेल्या वर्षी त्याच्या मर्जीने मुंबई सोडली. मात्र, हृदय सिंग यांचे वकील विनय नायर यांनी त्यावर आक्षेप घेतला. मिश्रा याने त्याच्या मर्जीने मुंबई सोडल्याचे पुरावे नाहीत, असे नायर यांनी न्यायालयाला सांगितले.

मिश्रा पोलिसांना घाबरत असल्याने जबाब देण्यासाठी पुढे आला नाही, असे नायर यांनी न्या. पी. बी. वराळे व न्या. एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठाला सांगितले. मिश्राच्या गावी पोलीस पथक रवाना करण्यात येईल आणि तिथे तो आढळल्यास त्याला न्यायालयात हजर करण्यात येईल, असे सरकारी वकिलांनी म्हटले. दरम्यान, न्यायालयाने निबंधकांना दंडाधिकाऱ्यांनी विजयच्या मृत्यूबाबत सादर केलेला चौकशी अहवालाची प्रत विजय नायर यांना देण्याचे निर्देश देत, याचिकेवरील पुढील सुनावणी ८ ऑक्टोबर रोजी ठेवली.

काय आहे प्रकरण?

विजयचे वडील हृदय सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार, ऑक्टोबर २०१९ मध्ये त्यांच्या घरी पूजा होती. पूजा आटोपून विजय त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी जात होता. रात्री १०:३० च्या सुमारास त्याच्या मित्रांना एक माणूस किंचाळत असल्याचा आवाज आला. ते जवळ गेले असता त्यांना दिसले की एक दाम्पत्य विजयला मारहाण करीत होते. त्यानंतर पोलिसांनी विजयला ताब्यात घेतले आणि वडाळा टी.टी. पोलीस ठाण्यात घेऊन गेले. पोलिसांच्या मारहाणीमुळे विजयच्या छातीत दुखू लागले. त्याने पोलिसांकडे पाणी मागितले, परंतु त्यांनी विजयला पाणी दिले नाही. विजयने छातीत खूप दुखत असल्याने डॉक्टरांकडे नेण्याची विनंती केली. पोलिसांनी त्यालाही नकार दिला. त्याच्या कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला, असे त्यांनी याचिकेत म्हटले आहे.