मुंबई : गावाकडील प्रेयसीच्या भेटीसाठी एका २० वर्षांच्या तरुणाने स्वत:च्याच अपहरणाचा डाव रचत गाव गाठले. प्रेयसीची भेट घेउन पुन्हा मुंबईत आल्यानंतर तरुणाच्या अपहरणाच्या नाट्यावर अॅण्टॉप हिल पोलिसांनी पडदा पाडला. त्याच्या या प्रतापामळे पोलिसांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागला.कानपूरचा रतनकुमार सोनकर (२०) महिनाभरापूर्वी मुंबईत आला होता. मामा राहुल सोनकर यांच्याकडे तो राहायचा. १६ तारखेला तो अचानक गायब झाला. त्याचा शोध सुरू असताना सायंकाळी मामांना फोन करून आपले अपहरण झाल्याचे त्याने सांगितले. मामा राहुल यांनी अॅण्टॉप हिल पोलिसांत तक्रार केली. दरम्यान त्याचे एकामागोमाग एक असे ८ ते ९ कॉल पोलिसांसह त्याच्या नातेवाइकांना आले. तेव्हा पोलिसांना संशय आला. तपासात रतनकुमारचा टॉवर लोकेशन कानपूर आले. पोलिसांनी कानपूरमधील भावासोबत संपर्क साधला असता तो तेथे येऊन गेल्याचे समजले. मंगळवारी पोलिसांनी त्याला तपासाअंती लोकमान्य टिळक टर्मिनसवरुन ताब्यात घेतले. प्रेयसी कानपूरमध्ये राहते. तिला भेटण्यासाठी मामा गावी पाठवणार नव्हता. म्हणून त्याने ही शक्कल लढविल्याचे समोर आले आहे.
प्रेयसीच्या भेटीसाठी रचला स्वत:च्या अपहरणाचा डाव
By admin | Published: April 20, 2017 4:45 AM