मुंबई : मुंबईत दाखल झालेली एसी लोकल सेवेत येण्याची प्रतीक्षा ही पुढील वर्षातच संपणार आहे. कारशेडमध्ये आणि प्रत्यक्षात लोकल मार्गावर एसी लोकलच्या चाचण्या बारा ते पंधरा आठवडते चालतील. त्यामुळे ही लोकल नव्या वर्षातच धावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दिवाळीपूर्वी या लोकलच्या चाचण्या सुरू करण्याचे नियोजन रेल्वेकडून केले जात आहे. साधारण सहा महिन्यांपूर्वी मध्य रेल्वेच्या कुर्ला कारशेडमध्ये ५४ कोटी रुपये किमतीची एसी लोकल दाखल झाली. ही लोकल दाखल होताच ती सेवेत दाखल होणार कधी, असा प्रश्न प्रवासी आणि संघटनांकडून उपस्थित करण्यात आला. मात्र सॉफ्टवेअरमध्ये येत असलेला अडथळा यामुळे एसी लोकलच्या चाचण्या घेण्यासाठी समस्या येत असल्याचे कारण पुढे करण्यात आले. सॉफ्टवेअरच्या मदतीसाठी बारा डबा एसी लोकलच्या चार मोटरकोचमध्ये इंडक्टर मशिन बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आणि सप्टेंबर महिन्याच्या शेवटी मशिन दाखल झाले. आता इंडक्टर मशिनही बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्याने सुरुवातीला एसी लोकलच्या कुर्ला कारशेडमध्ये काही चाचण्या घेण्यात येतील. या चाचण्यांना दिवाळीपूर्वी सुरुवात करण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती रेल्वेतील सूत्रांकडून देण्यात आली. कारशेडमध्ये घेण्यात येणारी चाचणी ही तीन आठवडे चालेल. जवळपास १२ ते १४ चाचण्या होतील. या चाचण्या पूर्ण केल्यानंतर कारशेडबाहेर एसी लोकल आणून त्याची लोकल मार्गावर चाचणी घेण्यात येईल. त्या चाचण्या घेण्यासाठी १२ ते १५ आठवडे लागतील. यामध्ये १८ चाचण्यांचे नियोजन आहे. (प्रतिनिधी)
एसी लोकलला २0१७ चा मुहूर्त
By admin | Published: October 13, 2016 5:53 AM