सेल्फी पॉइंटमधून दाखवली दहिसरच्या संस्कृतीची ओळख
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2020 08:37 PM2020-11-03T20:37:33+5:302020-11-03T20:38:07+5:30
लोकार्पण आज विभागप्रमुख-आमदार विलास पोतनीस आणि महिला विभागसंघटक सुजाता शिंगाडे यांच्या हस्ते पार पडला.
मनोहर कुंभेजकर
मुंबई : मुंबईचे शेवटचे टोक जरी दहिसर असले तरी,पालिकेच्या प्रभागांची सुरवात ही दहिसर पासून होते.पूर्वी दहिसर हे एक शांत गाव होते.येथे प्रामुख्याने आगरी व कोळी बांधव राहत होते.दहिसर नदीत तर चक्क मासेमारी चालत होती. 1970 नंतर दहिसरचे रूप बदलत गेले. आणि बघता बघता गेल्या 50 वर्षात दहीसरमध्ये अनेक नागरिक राहायला आले,अनेक गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या.मात्र आजच्या तरुण पिढीला आणि दहिसरकरांना येथील संस्कृतीची ओळख पटवून देण्यासाठी दहिसर नदी लगत खास सेल्फी पॉईंट येथील शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक 7 च्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी साकारला आहे. पहिल्याच दिवशी मोबाईलच्या कॅमेरातून सेल्फी काढण्यासाठी तरुणाईने येथे गर्दी केली आहे.
याचा लोकार्पण आज विभागप्रमुख-आमदार विलास पोतनीस आणि महिला विभागसंघटक सुजाता शिंगाडे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी स्थानिक नगरसेविका शीतल म्हात्रे, उपविभागप्रमुख भालचंद्र म्हात्रे, विधानसभा संघटक किशोर म्हात्रे,अविनाश लाड, महिला उपविभागसंघटक शकुंतला शेलार,गौरी खानविलकर, शाखा संघटक शर्मिला पाटील व दीपा चुरी,आणि कार्यकर्ते व विविध मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. या सेल्फी पॉईन्ट मध्ये मराठीत दहिसर लिहिले असून पूर्वी दहिसर नदी कशी होती आणि आता कशी आहे,पूर्वी नदीत मासेमारी सुरू होती हे दाखवण्यासाठी उभारलेली होडीची प्रतिकृती ,आणि येथील आगरी व कोळी बांधवांचे ग्रामदैवत असलेले भावदेवी मंदिर यांचे दर्शन याठिकाणी घडते.या सेल्फी पॉईंट मधून भूमीपूत्रांची ओळख व मराठी, आगरी व कोळी संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यात दहिसर नदीचे पुनर्जीवन करण्याची योजना असून येथे सायकल ट्रक देखिल उभा करण्याचा मानस असल्याचे शीतल म्हात्रे यांनी शेवटी सांगितले.