देशांतर्गत हवाई प्रवास सुरु झाल्याने हवाई वाहतूक क्षेत्राचा तोटा कमी होण्यास प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 06:24 PM2020-05-30T18:24:32+5:302020-05-30T18:25:01+5:30

आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक अद्यापही ठप्प असली तरी देशांतर्गत हवाई वाहतूक काही प्रमाणात सुरु झाल्याने या क्षेत्राला काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

With the introduction of domestic air travel, the losses of the air transport sector began to decrease | देशांतर्गत हवाई प्रवास सुरु झाल्याने हवाई वाहतूक क्षेत्राचा तोटा कमी होण्यास प्रारंभ

देशांतर्गत हवाई प्रवास सुरु झाल्याने हवाई वाहतूक क्षेत्राचा तोटा कमी होण्यास प्रारंभ

Next

 

खलील गिरकर

मुंबई : कोरोनामुळे देशभरात लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे भारतातील देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासी वाहतूक ठप्प झाली होती. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक अद्यापही ठप्प असली तरी देशांतर्गत हवाई वाहतूक काही प्रमाणात सुरु झाल्याने या क्षेत्राला काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशांतर्गत हवाई प्रवास सुरु झाल्याने हवाई वाहतूक क्षेत्राचा तोटा कमी होईल, मात्र परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी मोठा कालावधी लागण्याची शक्यता आहे असे मत या क्षेत्रातील जाणकारांनी वर्तवली आहे. प्रवास सुरु झाल्याने तोटा कमी होण्यास मदत होईल. 

या क्षेत्रातील जाणकार मंदार भारदे म्हणाले,  देशांतर्गत प्रवास सुरु झाल्याने या क्षेत्राचा त्वरित नफा होईल अशी परिस्थिती अजिबात नाही. प्रवास सुरु झाल्याने दोन महिन्यांपासून धावपट्टीवर पार्क असलेली विमाने वापरात आली आहेत. विमाने पार्क असताना देखील त्यांचा देखभाल खर्च सुरु असतो. प्रवास बंद असल्याने विमान कंपन्यांना मोठा तोटा होत होता तो तोटा आता काहीसा कमी होऊ शकेल. सध्या केवळ गरजू प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी आहे. केवळ अडकलेले प्रवासी याद्वारे प्रवास करत आहेत. सर्वसाधारण दोन महिने विमाने बंद असल्याने झालेले नुकसान भरुन काढणे सध्या शक्य नाही. मात्र दररोज होत असलेला तोटा कमी होण्यास यामुळे मदत होईल. विमाने व कर्मचारी पूर्वपदावर येण्यास हळूहळू मदत होईल,  असे भारदे म्हणाले.  विमान प्रवास करण्यासाठी अनुकूल असलेला काळ लॉकडाऊन मध्ये वाया गेला आहे व सध्या प्रतिकूल परिस्थिती असताना हा प्रवास सुरु होत आहे. त्यामुळे परिस्थिती पूर्वपदावर येण्यास कालावधी लागेल असा अंदाज भारदे यांनी व्यक्त केला. 

दुसरे जाणकार विपुल सक्सेना यांनी देशांतर्गत हवाई प्रवास सुरु करण्याच्या केंद्र सरकार च्या निर्णयाचे स्वागत केले. सरकारने हे अत्यंत धाडसी पाऊल उचलले आहे. सध्या केवळ अत्यावश्यक कारणांसाठी प्रवास करु इच्छिणाऱ्यांसाठी हा प्रवास सुरु असला तरी सध्या प्रवाशांचा जास्त भार नसल्याने कोरोनासोबत प्रवास करताना काय काळजी घ्यावी व कसा प्रवास करावा याचे प्रशिक्षण या काळात हवाई वाहतूक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मिळेल. सध्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे मात्र हे भीतीचे वातावरण हळूहळू कमी होत जाईल व विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाईल असा विश्वास सक्सेना यांनी व्यक्त केला. 

विमान प्रवास करताना विमानतळावर प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग केली जाते त्यामध्ये काही प्रवासी लबाडी करत असल्याचे समोर आले आहे. विमानतळावर प्रवेश करण्यापूर्वी ताप असल्यास तापाची गोळी खाणे,  वातानुकुलित यंत्रासमोर उभे राहून शरीराचे, डोक्याचे तापमान कमी करणे, थंड कापडाने डोके पुसणे असे प्रकार करुन प्रवासी इतर प्रवासी व विमान वाहतूक कंपन्यासोबत धोका करत आहेत. त्याचा फटका इतर प्रवासी व विमान कंपन्यांना बसत आहे त्यामुळे असे गैरप्रकार करणाऱ्या प्रवाशांविरोधात प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी सक्सेना यांंनी केली आहे. येत्या काळात प्रवाशांच्या संख्येत टप्याटप्याने वाढ होईल व लवकरच हेे क्षेत्र पूर्वपदावर येईल असा दावा सक्सेना यांनी केला. 

 

Web Title: With the introduction of domestic air travel, the losses of the air transport sector began to decrease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.