मुंबई : कोरोनाग्रस्त रुग्णांचा उपचार, तपासणी करताना वैद्यकीय कर्मचारी विशेष खबरदारी घेतात. यामध्ये आणखीन भर म्हणून पश्चिम रेल्वेने इनटयूबेशन बॉक्स तयार केला आहे. या बॉक्समुळे डॉक्टर आणि नर्स यांचा रुग्णाशी थेट संबंध न येता सुरक्षितरित्या कोरोनाग्रस्त रुग्णांचा उपचार करण्यास मदत होईल.
कोरोनाग्रस्त रुग्णांचा उपचार करण्यासाठी रेल्वे प्रशासन आयसोलेशन कक्ष तयार करत आहे. यासह मास्क, सॅनिटायझर, नॉन-कॉन्टॅक्ट वाटर कॅप बनवित आहे. त्याप्रमाणे आता पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ वर्कशॉपमधील रेल्वे कर्मचाऱ्यांनी इनटयूबेशन बॉक्स तयार केला आहे. कोरोनाग्रस्त रुग्णाचा उपचार करताना सुरक्षितता बाळगण्यासाठी या बॉक्सचा वापर केला जातो. रुग्णांच्या डोक्याकडील भाग या बॉक्समध्ये टाकण्यासाठी वक्रकार आकार आहे. या बॉक्सला दोन होल आहेत. या होलातून वैद्यकीय कर्मचारी हात घालून उपचार करू शकतो. परिणामी, रुग्णाची तपासणी करताना, व्हेंटिलेटर लावताना वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा थेट संबंध या बॉक्समुळे टाळता येणार आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळता येणे शक्य होणार होणार आहे. या बॉक्सचा आकार ३० बाय 24 बाय 20 असा आहे. हा बॉक्स पारदर्शी असून २ ते ३ किग्रचा आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली.
वैद्यकीय कर्मचारी टीमकडून अशाप्रकारची सामग्री तयार करण्याची सूचना आल्या होत्या. जेणेकरून वैद्यकीय कर्मचारी आणि कोरोना रुग्ण यांचा थेट संबंध येणार नाही. त्यामुळे लोअर परळ येथे इनट्यूबेशनचे पाच बॉक्स तयार केले गेले आहेत. लोअर परळ वर्कशॉपचे उपमुख्य यांत्रिक अभियंता अरुण कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाने बेसिक ट्रेनिंग सेंटर, लोअर परेल मध्ये इनट्यूबेशन बॉक्स तयार करण्यात आला आहे. जगजीवन राम रुग्णालयात या बॉक्सचा वापर केला जाणार आहे. कोरोना रुग्णांचा उपचार करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना बळ देण्यासाठी सज्ज आहोत, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.