Join us

‘हेमंत’ रागाचा आविष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2020 1:57 AM

थंडीचे दिवस म्हणजे ‘हेमंत’ ऋतू असे समजले जाते. ‘हेमंत’ ऋतूत खास वेगळे राग गायले जातात.

- अमरेंद्र धनेश्वर

थंडीचे दिवस म्हणजे ‘हेमंत’ ऋतू असे समजले जाते. ‘हेमंत’ ऋतूत खास वेगळे राग गायले जातात. ‘मालकंस’ हा राग तसा शिशिर ऋतूत पूर्वी गायला जायचा, असा उल्लेख आढळतो. कुमार गंधर्वांनी ऋतुसंगीताचे अभिनव प्रयोग केले होते. त्यात ‘गीतहेमंत’ नामक आगळा कार्यक्रम होता. कुमारांनी या कार्यक्रमात ‘दुर्गा’, ‘मालकंस’ वगैरे रागाचा आवर्जून समावेश केला होता.

‘हेमंत’ हा राग सहसा गायला जात नाही. गायक दिनकर कायकिणी हा राग फार सुंदररीत्या गात असत. ‘हेमंत’ हा राग वादकांचा राग आहे, असे मानले जाते.आणि हे सहाजिकच आहे. कारण एका महान वादकाने या रागाची निर्मिती केली आहे. हा महान वादक म्हणजे अन्य कुणी नसून अल्लाउद्दीन खान खाँसाहेब हेच होते. ‘मैहर’ घराण्याचे संस्थापक आणि रविशंकराचे गुरू म्हणून ते जगाला ज्ञात आहेत. त्यांची कन्या आणि शिष्या अन्नपूर्णादेवी यांनी आयुष्यभर केवळ विद्यादान करून संगीताची सेवा केली. त्यांचे एक शिष्य सुरेश व्यास हे चांगले सरोदवादक आहेत. त्यांचा कार्यक्रम ऐकण्याचा योग शिवाजी पार्क नागरिक संघामुळे आला.

सुरेश व्यास यांनी आपल्या तासाभराच्या कार्यक्रमात ‘हेमंत’ राग वाजविला. शुद्ध स्वरांचा हा राग ऐकताना कुठेतरी हा निसर्गाच्या जवळ आपल्याला नेतो आहे, असे वाटत होते. त्यांनी मिंडकाम, गमके यातून रागाचा छान विस्तार केला. त्यांनी रविशंकर आणि अली अकबर खान यांनी अजरामर केलेली ‘सिंधुभैरवी’ही वाजवली. अनुतोष देघारिया यांनी तबल्यावर उत्तम साथ केली. याच कार्यक्रमात शंकरराव अभ्यंकरांची शिष्या अक्षया कृष्णन हिचे गायन झाले. तिने अभ्यंकरांच्या ‘भूपाली’ रागातल्या विविध रचना गायल्या. रसिकांनी तिचे कौतुक केले.

पं. भीमसेन जोशी समारोह

महाराष्ट्र शासनाने भीमसेन जोशींच्या नावे पुरस्कार आणि समारोह सुरू करून आता नऊ वर्षे झाली. यंदाचा पुरस्कार ज्येष्ठ सतारवादक अरविंदभाई परिख यांना जाहीर झाला आहे. मंगळवारी, ४ फेब्रुवारी रोजी समारंभपूर्वक हा पुरस्कार रवींद्र नाट्य मंदिरात देण्यात येणार आहे. त्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या समारोहात उत्तमोत्तम कलाकारांचे गायन/वादन ऐकायला मिळणार आहे. ४, ५, आणि ६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी समारोह होणार असून, रसिकांना हार्दिक निंमत्रण देण्यात आले आहे. त्यात वरद भोसले (सतार), पूर्वी परिख (गायन), संजय गरुड (गायन), कैलाश पात्र (व्हायोलिन), मोहन दरेकर (गायन), दीपक क्षीरसागर (गिटार) आणि श्रुती सडोलीकर (गायन) हे कलाकार सहभागी होत आहे.

टॅग्स :महाराष्ट्रविधानसभा हिवाळी अधिवेशन