Join us

'मत्स्यांगण' मध्ये कलात्मक प्रेमाचा आविष्कार

By स्नेहा मोरे | Published: November 12, 2023 8:42 PM

Mumbai: कुलाबा येथील जहांगीर कला दालनात चित्रकार चंद्रशेखर कुमावत यांनी ' मत्स्यांगण ' प्रदर्शनाच्या  माध्यमातून मत्स्यगंधा आणि तिच्या प्रियकराची कथा रेखाटली आहे.

मुंबई -  कुलाबा येथील जहांगीर कला दालनात चित्रकार चंद्रशेखर कुमावत यांनी ' मत्स्यांगण ' प्रदर्शनाच्या  माध्यमातून मत्स्यगंधा आणि तिच्या प्रियकराची कथा रेखाटली आहे. ' मत्स्यांगण : प्रेमाचे प्रतीक ' शीर्षक असलेले हे प्रदर्शन उत्साही आणि संग्राहकांसाठी एक सुंदर कला अनुभव उलगडणार आहे. हे चित्रप्रदर्शन कला रसिकांसाठी १३ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत खुले असणार आहे.

गेल्या दोन दशकांत अमूर्त कला शैलींचा प्रभाव कमी झाला आहे, ज्यामुळे अलंकारिक कला प्रकारांच्या पुनरुत्थानाचा मार्ग निर्माण झाला आहे. या बदलाने केवळ कलाकारांनाच नव्हे तर कलाप्रेमी आणि संग्राहकांनाही मोहित केले आहे, विशेषतः वास्तववादी चित्रणाच्या क्षेत्रात हे दिसून येते. मूळचे पुण्याचे असलेले चंद्रशेखर कुमावत यांनी कला साधनेतून अलंकारिक माध्यमात स्वतःची विशिष्ट आणि मोहक शैली तयार केली आहे. पेन स्ट्रोक, ठिपके, रेषा आणि ठळक काळी वर्तुळे यांचे मिश्रण असलेली त्यांची कलात्मकता अनुभवांमध्ये नाजूकपणे विणलेली आहे.

या प्रदर्शनात ही कथा एकाचवेळी स्वप्नवत आणि गुंतागुंतीची आहे. भावनांचे विविध पदर या कथेला जोडलेले आहेत.  कुमावत हे प्रामुख्याने कॅनव्हासवर ऍक्रेलिक माध्यमात काम करतात. त्याचबरोबर इंक आणि पेन या माध्यमात त्यांनी तपशिलांनी पूर्ण असलेले अद्भुत काम केले आहे. पेन आणि शाई या माध्यमात काम करताना कुमावत यांचे रेषेवरील प्रभुत्व ठळकपणे दिसून येते.  रेखांकन, फॉर्म आणि तंत्र यांचा परस्परसंवाद अद्भुतरित्या कुमावत  कामातून कॅनव्हासवर दाखवतात.

चंद्रशेखर श्रावण  कुमावत पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयात सहाय्यक अधिव्याख्यात म्हणून कार्यरत आहेत. प्रकाश, रंग, स्पेस, आकारांची नाट्यपूर्ण मांडणी यासारख्या घटकांच्या महत्त्वावर जोर देऊन कुमावत कलाकाराची सर्जनशील प्रक्रिया आणि नैसर्गिक जग यांच्यातील समांतरता रेखाटते. ब्रश किंवा पेनचा प्रत्येक स्ट्रोक केवळ कलाकाराच्या कल्पनाच व्यक्त करत नाही तर कलाकाराचे अंतर्मन बाह्य जगापर्यंत पोहोचवते.

टॅग्स :मुंबई