Join us

तीन आमदारांचा उलटा प्रवास

By admin | Published: February 14, 2017 4:42 AM

श्रीमंत महापालिकांच्या मांदियाळीत वरच्या क्रमांकावर असणारी मुंबई महापालिकेची भुरळ सर्वच राजकीय मंडळींना असते. एरव्ही

मुंबई : श्रीमंत महापालिकांच्या मांदियाळीत वरच्या क्रमांकावर असणारी मुंबई महापालिकेची भुरळ सर्वच राजकीय मंडळींना असते. एरव्ही आमदार बनून विधिमंडळात वावरलेला राजकारणी परत स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका लढविण्याचा विचारही करत नाही, पण मुंबई महापालिकेची महतीच वेगळी आहे. इथे अनेकांना आमदारकी, खासदारकीपेक्षा नगरसेवक पद आणि महापालिकेच्या कारभाराचा मोह सुटत नाही. त्यामुळेच आमदारकी गाजविणारे तब्बल तीन जण यंदा नगरसेवक पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. प्रदेश भाजपाचे प्रवक्ते अतुल शाह यांनी यापूर्वी आमदारकी भूषवली आहे, शिवाय मागील विधानसभा निवडणूकही त्यांनी लढवली होती. मात्र, त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला होता. आता हेच अतुल शाह मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २२० मधून नगरसेवक पदासाठी भाजपाचे उमेदवार आहेत. आमदारकी मिळाली नाही, आता किमान श्रीमंत महापालिकेत नगरसेवक तरी बनता येईल का, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु प्रदेश प्रवक्ता असणारा आणि आमदारकी गाजविलेल्या माणूस नगरसेवक पदासाठी उभा राहिल्याने स्थानिक पातळीवर छोट्या कार्यकर्त्यांची संधी नाकारली गेल्याची भावना स्थानिक भाजपा पदाधिकारी व्यक्त करतात. अतुल शाह यांच्याप्रमाणेच शिवसेना उपनेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर आणि माजी आमदार विशाखा राऊत याही दादर येथील प्रभाग क्रमांक १९१ मधून नशीब आजमावत आहेत, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विक्राळीतील माजी आमदार मंगेश सांगळेसुद्धा यंदा नगरसेवक पदासाठी भाजपाकडून मैदानात उतरले आहेत. आमदार बनण्यापूर्वी मंगेश सांगळे याच भागातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. (प्रतिनिधी)