Join us

गुंतवणूक करा तरुण वयात, आनंदाने जगा उतारवयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2022 12:08 PM

तरुण वयातच निवृत्ती अनेक वर्षे दूर असताना तसे गुंतवणुकीचे ध्येय ठेवत बचत करण्यास सुरुवात करणे  फायदेशीर ठरते. 

मुंबई : फिटनेस ॲपवर आपले ध्येय निश्चित करणे हे अतिशय आत्मविश्वास निर्माण करणारे आणि प्रेरणादायी असते. ज्यावेळी तुम्ही व्यायाम कमी करता, त्यावेळी हे स्मार्टवॉच तत्काळ माहिती देते. त्याचप्रमाणे ध्येय न ठेवता गुंतवणूकदारांना किती बचत करायची, किती जोखीम पत्करायची आणि कोणत्या कोणत्या प्रकारची गुंतवणूक करायची, हे माहिती नसते. त्यामुळे तरुण वयातच निवृत्ती अनेक वर्षे दूर असताना तसे गुंतवणुकीचे ध्येय ठेवत बचत करण्यास सुरुवात करणे  फायदेशीर ठरते. 

पहिलाच पगार मिळत असताना...-

जर तुम्ही नोकरीच्या अथवा उद्योगातील कमाईच्या सुरुवातीच्या टप्प्यात असाल, तर तुम्ही सेवानिवृत्तीसाठी बचत करताना धावण्याऐवजी मॅरेथॉन म्हणून पाहावे. ४० किंवा ५० व्या वर्षी निवृत्त होण्यासाठी आवश्यक असलेल्या पैशांवर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी, जे पूर्णपणे आवाक्याबाहेरचे वाटू शकते, असे लक्ष्य ठेवावे. जर तुम्ही वयाच्या २०व्या वर्षी बचत करायला सुरुवात केली तर तुम्ही सेवानिवृत्तीवेळी ६० ते ७० टक्के अधिकची रक्कम गुंतवणुकीतून मिळवू शकता.

असे ठेवा खर्चावर नियंत्रण-

एकदा तुम्ही मासिक/साप्ताहिक बचतीचे उद्दिष्ट निश्चित केले की, तुम्ही ते कसे साध्य करणार आहात, यावर काम करणे आवश्यक आहे. यात तुम्ही पैशांची आवक-जावक आणि त्यातून नेमकी किती बचत करणार आहात, हे निश्चित करू शकता. तुमच्या पे स्लिपवर आधारित तुमचे मासिक उत्पन्न काढा तर इतर उत्पन्न रोखीने करा. त्यानंतर तुमचा नेमका खर्च आणि बचत किती, हे कळायला अधिक सोपे होईल. जर तुम्हाला बचतीसाठी अधिक पैसे ठेवायचे असतील तर वायफळ खर्च नेमका कुठे होतो, हे लक्षात घेत तो तातडीने कमी करा.

बचतीचे उद्दिष्ट ठरवा

बचतीचे उद्दिष्ट ठरविण्याचे आणखी एक कारण म्हणजे लक्ष्य असल्याने तुम्हाला सतत प्रेरणा मिळते. बचतीचे उद्दिष्ट सेट करा, त्याला एक नाव द्या, ते लिहून ठेवा आणि ते कुठेतरी पिन करा, जिथे तुम्हाला ते अनेकदा दिसेल. त्यामुळे तुम्हाला बचत करायची आहे, हे सतत तुमच्या लक्षात राहील. एकदा तुम्ही ध्येय निश्चित केले की, तुम्हाला मासिक किती बचत करायची आहे हे लक्षात येईल. किमान ३० ते ३५ वर्षे नोकरी केल्यानंतर तुम्हाला मनसोक्त सेवानिवृत्ती घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. तुम्ही वयाच्या अतिशय कमी कालावधीत घेतलेले आर्थिक निर्णय तुमच्या निवृत्तीत अतिशय आनंद देऊन जातात.

टॅग्स :आरोग्य