मुंबई : सोशल मीडियावरील स्टॉक मार्केटच्या जाहिरातीला भुलून गुंतवणूक करणे मुलुंडमधील गृहिणीला भलतेच महागात पडले आहे. या महिलेची तीन लाख ९५ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाली आहे.
फसवणूक झालेल्या ५१ वर्षीय महिलेचा पती स्पेनमध्ये जहाजावर नोकरी करतो. ही महिला ३१ मार्चला फेसबुकवर सर्फिंग करीत असताना रचना रानडे यांच्या स्टॉक मार्केट ग्रुपला जॉइन करण्यासंबंधी पोस्ट त्यांना दिसली. त्यांनी लिंकवर स्पर्श करताच गुगल फॉर्म ओपन झाला. त्यात सर्व माहिती भरताच त्यांना एका व्हॉट्सॲप ग्रुपला जोडण्यात आले. त्यावर स्टाॅक मार्केटमधील गुंतवणुकीवर होणाऱ्या नफ्याबाबत चर्चा सुरू होती. ग्रुपवरील अनेकजण नफ्याच्या पोस्ट टाकत होते. त्यामुळे तक्रारदार महिलेलाही नफ्याचा मोह आवरता आला नाही. तिनेही गुंतवणुकीत रस दाखवला. त्यानंतर एक लिंक पाठवून त्यांना ॲप डाउनलोड करण्यास भाग पाडले. सल्ल्यानुसार त्यांनी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. महिलेने ३ जूनपर्यंत तीन लाख ९५ हजार रुपयांची गुंतवणूक केली.
शंकेची पाल चुकचुकली...
तक्रारदार महिलेने केलेली गुंतवणूक आणि नफा मिळावा यासाठी संबंधितांकडे तगादा सुरू केला, मात्र अनेक कारणे पुढे करत तिला आणखी गुंतवणूक करण्यास सांगण्यात आले. तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तिने नातेवाइकांकडे चौकशी करताच आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. मुलुंड पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.