मुंबई : नव्याने अस्तित्वात आलेल्या आदिवासीबहुल पालघर जिल्ह्यात माध्यमिक शिक्षण विभागासाठी अद्याप पूणर्वेळ शिक्षणाधिकारीच नाही. मुंबईतील एका शिक्षण निरीक्षकांकडे तात्पुरत्या स्वरूपात हा कारभार आहे. मात्र सदर अधिकारी लाच दिल्याशिवाय कामच करीत नसल्याने सहा महिन्यांपासून सेवासातत्याचे प्रस्ताव रखडले आहेत. यामुळे या अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधान परिषदेत केली. पालघर जिल्ह्याला माध्यमिक शिक्षणाधिकारी हे पूणर्वेळ नसल्यामुळे शिक्षण विभागातील अनेक कामे ठप्प झाली आहेत. ठाणे जिल्ह्याच्या विभाजनानंतर ठाणे जिल्ह्यात येणाऱ्या वसई, विरार, डहाणू, पालघर, मोखाडा या तालुक्यांच्या हजारो फाइल्स ठाणे शिक्षण विभागाने पालघर जिल्ह्याकडे हस्तांतरिीत केल्या आहेत. पालघर येथे कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने त्या पुन्हा तेथे प्रलंबित राहत आहेत. ही बाब गंभीर असून, याविषयी शिक्षणाधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणही आमदार मोते यांनी केली. त्यावर शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पालघर जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांचीही याबाबतची माहिती खरे असल्याचे सांगितले.
लाचखोर शिक्षणाधिकाऱ्यांची चौकशी करा
By admin | Published: March 28, 2015 1:44 AM