Join us

संजय राऊत यांच्याविरोधात महिलेने केलेल्या तक्रारीची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 4:05 AM

उच्च न्यायालयाचे मुंबई पोलीस आयुक्तांना निर्देशलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत व आपल्या पतीच्या वतीने ...

उच्च न्यायालयाचे मुंबई पोलीस आयुक्तांना निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत व आपल्या पतीच्या वतीने काही गुंड आपल्यावर सतत नजर ठेवून असतात व आपला मानसिक छळ करतात, अशी तक्रार एका ३६ वर्षीय महिलेने केली. या तक्रारीनुसार चौकशी करा. २४ जूनपर्यंत अहवाल सादर करा, असे निर्देश न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने पोलीस आयुक्तांना दिले.

मानसोपचार तज्ज्ञ असलेल्या ३६ वर्षीय महिलेने फेब्रुवारीमध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत व तिच्या पतीच्या वतीने काही गुंड तिच्यावर सतत नजर ठेवून आहेत व मानसिक छळवणूक करत आहेत, असे याचिकेत म्हटले आहे.

याचिका दाखल केल्यानंतर संबंधित महिलेला अदखलपात्र गुन्ह्यासाठी अटक करण्यात आली. तिची पीएच.डी.ची डिग्री बनावट असल्याचा पोलिसांचा दावा आहे, असे याचिकाकर्तीच्या वकील आभा सिंग यांनी न्यायालयाला सांगितले. याचिकाकर्ती गेले १२ दिवस कारागृहात आहे. तिने उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर संपूर्ण पोलीस यंत्रणा तिच्यामागे लागली आहे. हे सर्व कुहेतूने करण्यात येत आहे, असे सिंग यांनी म्हटले.

त्यावर न्यायालयाने याचिकाकर्ती तिच्या अटकेबाबत स्वतंत्र याचिका दाखल करू शकते, असे नमूद केले. याचिकाकर्तीने केलेल्या तक्रारीत पोलीस आयुक्तांनी लक्ष घालावे आणि योग्य ती पावले उचलावीत. त्यांनी २४ जूनपर्यंत यासंबंधी अहवाल दाखल करावा, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले.

संबंधित महिलेने २०१३ ते २०१८ या काळात तिला होत असलेल्या त्रासासंबंधी पोलिसांकडे तीनदा तक्रार नोंदवली. मात्र, संबंधितांवर काहीही कारवाई करण्यात आली नाही, असे याचिकाकर्तीचे म्हणणे आहे. तर, मार्चमधील सुनावणीत संजय राऊत यांच्यावतीने ज्येष्ठ वकील प्रसाद ढाकेफळकर यांनी याचिकाकर्तीने केलेले सर्व आरोप फेटाळले. याचिकाकर्ती आपली फॅमिली फ्रेंड असून आपल्याला मुलीप्रमाणे आहे, असे राऊत यांच्यावतीने त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले होते.

.........................................