आरेतील आगीच्या घटनांची सखोल चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:06 AM2021-03-28T04:06:34+5:302021-03-28T04:06:34+5:30
रवींद्र वायकर यांचे वरळी दुग्धशाळा आयुक्तांना पत्र लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये आरेमध्ये अचानक आग लागण्याच्या ...
रवींद्र वायकर यांचे वरळी दुग्धशाळा आयुक्तांना पत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये आरेमध्ये अचानक आग लागण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच आगीच्या घटनांनंतर त्या ठिकाणची सद्यस्थिती काय आहे, याची महिती घ्यावी, असे पत्र जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी वरळी दुग्धशाळा आयुक्तांना पाठवले आहे.
जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील गोरेगाव पूर्व आरे कॉलनी येथे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून मार्च १५पर्यंत जवळपास १५हून अधिक आकस्मिक आगी लागण्याचे प्रकार घडले. अग्निशमन दलाच्या अहवालात आरेमध्ये वर्षभरात २७ वेळा आगी लागल्याचे नमूद आहे. दिवसागणिक आरेत आकस्मिक आगी लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यामुळे येथील पर्यावरणाची हानी होत असून जंगले नष्ट करण्याचा हा प्रकार असल्याचे निदर्शनास येत आहे. या ठिकाणी आगी लागतात की लावल्या जातात? की जागा बळकावण्याचा प्रयत्न होताे, याची सखोल चौकशी आरे प्रशासनाने करावी, यात कुणी दोषी सापडल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे वायकर यांनी पत्रात नमूद केले.
आरेमधील ८०० एकर जागा महाराष्ट्र शासनाने जंगल म्हणून घोषित केल्याने या वनक्षेत्राच्या सुरक्षेसाठी अग्नी व्यवस्थापन योजना राबविणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. यामुळे सुरुवातीस आरेमध्ये अग्निशमन केंद्र होते ते पुन्हा सुविधांसह सुरू करावे, जेणेकरून येथे अचानक लागणाऱ्या आगीच्या घटनांवर वेळीच नियंत्रण मिळविणे शक्य होईल, तसेच जंगलाची हानी होणार नाही, अशी मागणीही वायकर यांनी पत्राद्वारे केली.
......................