कर्नाळा बँकप्रकरणी तातडीने चौकशी करा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2021 01:40 AM2021-01-16T01:40:59+5:302021-01-16T01:41:09+5:30
उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कर्नाळा सहकारी बँकेत अनेक सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या ठेवी आहेत. बँकेच्या कामकाजात गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारींमुळे ठेवीदारांच्या अडचणी वाढल्या. या ठेवीदारांच्या हितासाठी बँकेवर तातडीने कारवाई करावी, गैरव्यवहार प्रकरणासंदर्भातील तक्रारींची चौकशी वेळेत पूर्ण करून दोषींवर कारवाई करावी, असे निर्देश विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी दिले.
कर्नाळा सहकारी बँक ठेवीधारकांना न्याय देणे, अवैध खासगी सावकारीवर नियंत्रण आदींवर सहकारी बँक व सहकार विभागाची भूमिका, या विषयांवर शुक्रवारी विधान भवनात गाेऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे बैठक झाली. कर्नाळा बँकेचे अन्य बँकेत विलीनीकरण करून ठेवीदारांना तातडीने न्याय देता येईल का, यासंबंधी सहकार विभागाने प्रस्ताव तयार करावा. शेतकऱ्यांची फसवणूक झाली असल्यास त्यांना तातडीने सहकार विभागाशी संपर्क साधता यावा यासाठी सहकार विभागाने हेल्पलाइन नंबर आणि व्हॉटस्ॲप नंबर जाहीर करावा, असे गोऱ्हे म्हणाल्या. तर सहकार विभागाचे प्रधान सचिव अरविंदकुमार म्हणाले, अनियमित व्यवहार झाले आहेत, त्या सर्व बँकांचे मागील पाच वर्षांतील लेखा परीक्षणाचे अहवाल तपासून दोषींवर कारवाई करण्यात येईल.