मुंबई
पीएचडी पदवीसाठी विद्यार्थ्यांना वर्षानुवर्षे वाट बघावी लागत मुंबई विद्यापीठाने नील सोमैय्या यांना अवघ्या १४ महिन्यात पीएचडी बहाल कशी काय केली याची चर्चा रंगत असतानाच त्यांचे वडील माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मिळविलेल्या पीएचडीची माहिती विद्यापीठातून मिळत नसल्याची तक्रार युवासेनाकडून करण्यात आली आहे.
विद्यापीठाकडून पीएचडी प्राप्त कोणत्याही विद्यार्थ्याला पीएचडी प्राप्त झाल्यानंतर त्याची एक प्रत विद्यापीठातील प्रबंध विभाग, वाणिज्य किंवा ज्या शाखेशी संबंधित पदवी आहे तो विभाग किंवा विद्यापीठाच्या ग्रंथालयात असणे आवश्यक असते. मात्र सोमय्या यांच्या पीएचडी प्रबंधाची प्रत नेमक्या कुठल्या विभागात आहे किंवा आहे कि नाही याबाबतची माहिती देण्यास विद्यापीठ प्रशासनाकडून मागील ३ महिने टाळाटाळ केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे युवासेनेकडून माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पदवीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याच पार्श्वभूमीवर युवासेनेकडून मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलातील आंबेडकर भवनासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.