Join us

'बेस्टची थकबाकी ठेवणाऱ्या बिल्डरची एसआयटी मार्फत चौकशी करा'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2021 2:06 PM

भाजपा आमदारांची विधानसभेत आग्रही मागणी

ठळक मुद्देभाजपा आमदारांनी विधानसभेत केली आग्रही मागणीबेस्टचे १६० कोटी रूपये थकित, एकनाथ शिंदे यांची माहिती

आर्थिक तोट्यात असलेल्या बेस्ट उपक्रमाची बिल्डरकडे गेले १३ वर्षे असलेल्या थकबाकी आणि त्यात होत असलेल्या विलंबाबाबत एसआयटी मार्फत चौकशी करा अशी आग्रही मागणी भाजपा आमदारांनी विधानसभेत आज केली. बेस्ट उपक्रमाच्या डेपोंचा व्यावसायिक वापर करण्यासाठी विकासकांना देण्यात आले. यावेळी झालेल्या करारानुसार बेस्टला देय्य असलेल्या रकमेपैकी ३२० कोटी रूपये बिल्डरकडे थकित असल्याचे तारांकित प्रश्नाद्वारे निदर्शनास आणून याबाबत काय कार्यवाही करणार असा प्रश्न भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. त्याला उत्तर देताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, बेस्टचे १६० कोटी रूपये थकित असून याबाबत लवादाकडे हा विषय प्रलंबित आहे. मात्र या उत्तराला जोरदार हरकती घेऊन भाजपा आमदार अॅड आशिष शेलार यांनी ही बाब गंभीर असलेल्याकडे  सभागृहाचे लक्ष वेधले. विकासकांना देण्यात आलेल्या जागा त्यांचा त्यांना त्यावेळी मिळालेला एफएसआय, टिडीआर, कमर्शियल युटिलायझेशन आणि त्यानंतर शासनाचे नियम बदलल्यानंतर अधिकचा होणारा विकासकांना फायदा याबाबत विचार करण्यात आला आहे का? या प्रकरणात अधिकचे फायदे घेऊन सुद्धा विकासक जर बेस्टचे पैसे थकित ठेवत असतील तर हा मोठा घोटाळा आहे. त्यामुळे याबाबत एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.तिच मागणी लावून धरत भाजपा नेते आमदार अतुल भातकळर, आमदार योगेश सागर यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून आलं. हा प्रस्ताव ज्यावेळी बेस्ट मध्ये मंजूर झाला त्यावेळीच काही चुकीच्या बाबी घडल्या आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करा, अशी मागणी केली. हे प्रकरण लवादाकडे असल्याचे सांगत मंत्री एकनाथ शिंदे यांनी एसआयटी चौकशी नाकारली. 

टॅग्स :मुंबईबेस्टमहाराष्ट्र बजेटआशीष शेलारचंद्रकांत पाटीलअतुल भातखळकरएकनाथ शिंदे