मुंबई : भांडुप पश्चिम येथील ड्रीम्स मॉलमधील सनराईज रुग्णालयाला लागलेल्या भीषण आगीत ११ रुग्णांचा बळी गेला. या आगीची चौकशी निवृत्त न्यायाधीशांमार्फत करण्याची मागणी स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी करण्यात आली. तसेच या रुग्णालयाला तात्पुरते ताबा प्रमाणपत्र देणाऱ्या तत्कालीन आयुक्तांची चौकशी करावी, अशी मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी लावून धरली आहे. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी हरकतीचा मुद्द्याद्वारे या गंभीर घटनेकडे लक्ष वेधले. या मॉलच्या तिसऱ्या मजल्याला ताबा प्रमाणपत्र नव्हते. मात्र फक्त व्हॉट्सॲप मेसेजवर अर्ज आला म्हणून ताबा प्रमाणपत्र देऊन रुग्णालय सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. एवढी अनियमितता असताना रुग्णालयाला परवानगी कशी? या प्रकरणात तत्कालीन आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी रवी राजा यांनी केली.कमला मिल कंपाऊंड दुर्घटनेत अधिकारी-कर्मचाऱ्यांना निलंबित केल्यानंतर चौकशी करून कारवाई करण्यात आली. राज्यात आपले सरकार असताना ११ जणांचे बळी घेणाऱ्यांवर काहीच कारवाई होत नाही. आता या मुद्द्यावर रोज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहिणार, असा इशारा समाजवादीचे गटनेते रईस शेख यांनी दिला. या रुग्णालयाची ओसी तात्पुरती असल्याने फेरविचार करण्याची सूचना अधिकाऱ्यांनी केली असता प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले, असा आरोपही शेख यांनी केला.
सनराईज रुग्णालयातील आगीची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा, नगरसेवकांनी केली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2021 4:16 AM