मुंबई-एमएचटी-सीईटीच्या निकालात पारदर्शता आणण्याकरिता सीईटी-सेलने प्रत्येक विद्यार्थ्याला त्याची आन्सर शीट, परीक्षेत मिळालेले प्रत्यक्ष गुण, त्यानुसार काढलेले पर्सेंटाईल ही माहिती उपलब्ध करून देऊन त्यांच्या शंकाचे निरसन करावे, अशी मागणी युवा सेना प्रमुख आणि उद्धव सेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. तसेच, २४ पेपरमध्ये ५४ चुकीचे प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात, असा प्रश्न करत सीईटी सेलच्या कारभाराची चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे.
सीईटी सेलद्वारे जाहीर करण्यात आलेल्या एमएचटी-सीईटीच्या निकालात अनेक त्रुटी असल्याची तक्रार विद्यार्थी आणि पालक करत आहेत. या विद्यार्थी पालकांनी ठाकरे यांना भेटून आपले गाऱहाणे मांडले. विद्यार्थ्यांची बाजू समजून घेतल्यानंतर ठाकरे यांनी गुरूवारी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांना पत्र लिहून इंजिनिअरिंग, फार्मसीची प्रवेश प्रक्रिया थांबविण्याची मागणी केली. त्यानंतर शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन सीईटी-सेलच्या कारभाराच्या चौकशीची मागणी त्यांनी केली.
सीईटी सेल चुकीच्या प्रश्नावर आक्षेप घेण्याकरिता प्रति प्रश्न एक हजार रूपये आकारते. या सीईटी २४ पेपरमधील चुकीच्या प्रश्नावर १४२५ विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवला होता. हे पाहता पैसे कमावण्यासाठी सीईटी घेतली होती का असा प्रश्न करत त्यांनी विद्यार्थ्यांकडून घेतलेले हे पैसे परत करण्यात यावे, अशी मागणी केली. तसेच २४ पेपरमध्ये मिळून ५४ चुका आढळून आल्या आहेत. चुकीच्या प्रश्नांची संख्या पाहता या प्रश्नपत्रिकेचा ज्यांनी तयार केल्या त्यांची योग्यता तपासली पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी परीक्षेच्या आयोजनाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केला.
काही विद्यार्थ्यांना इतरांच्या तुलनेत अधिक गुण असूनही त्यांचा पर्सेंटाईल कमी आहे. अशा विद्यार्थ्यांना तुमचा पेपर सोपा होता आणि दुसऱयाचा कठीण होता, असे अजब उत्तर सीईटी-सेलकडून दिले जात आहे. परंतु, पेपर सोपा होता की कठीण हे कुणी ठरवायचे? हे पेपर कोण तयार करते? विद्यार्थ्यांना त्यांची आन्सरशीट का दिली जात नाही, कुणाला किती मार्क मिळाले हे सीईटी सेल दाखवायला का तयार होत नाही, या प्रश्नांची उत्तरे उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी द्यावी, अशी मागणी ठाकरे यांनी केली.
फेरपरीक्षा नको, पारदर्शकता हवी
कुणालाही फेरपरिक्षा नको आहे. पण ही परीक्षा कशी घेतली, गुण कसे मोजले, रिझल्ट कसा लावला हे काही प्रश्न आहे. त्यांचे समाधानकारक उत्तर सीईटी सेलने द्यावे.-आदित्य ठाकरे
परीक्षेनंतर आन्सर की तपासण्याकरिता वेबसाईटवर देण्यात आली. मात्र तीन दिवसांनी ती काढून टाकण्यात आली. विद्यार्थ्यांना आता फक्त पर्सेंटाईल कळविला गेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी स्क्रीन शॉट काढून ठेवले होते, ते आता मिळालेल्या गुणांनुसार पर्सेंटाईल नसल्याचे दाखवून देत आहेत. तर त्यांच्या शतकाचे निरसन करण्याऐवजी त्यांनी स्क्रीन शॉट का काढले असा अनाठायी प्रश्न त्यांना सीईटी-सेलकडून केला जात असल्याची टीका ठाकरे यांनी केली.
एकाच प्रश्नपत्रिकेच्या आधारे सीईटी घ्या
एमएचटी-सीईटीच्या आधारे व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश निश्चित होतात. त्यावर विद्यार्थ्यांचे करिअर अवलंबून असते. या परीक्षेविषयी कोणत्याही विद्यार्थ्याच्या मनात शंका राहू नये म्हणून एकाच वेळी एकाच प्रश्नपत्रिकेच्या आधारे परीक्षा घेण्याची मागणी ठाकरे यांनी केली आहे.