‘त्या’ डॉक्टरच्या मृत्यूची चाैकशी करा; मार्डची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 03:16 PM2024-03-06T15:16:41+5:302024-03-06T15:19:35+5:30
डॉ. सौरभ धुमाळ यांचा मृत्यू रिॲक्शनमुळे झाला आहे की, यामागे वेगळे कारण आहे, अशी चर्चा निवासी डॉक्टरांमध्ये सुरू आहे. त्यांच्या बेडवर सलाइन, खोकल्याच्या औषधाची बाटली, गोळ्या आढळल्या.
मुंबई : सायन रुग्णालयातील निवासी डॉ. सौरभ धुमाळ यांचा मृतदेह त्यांच्या हॉस्टेलच्या खोलीत आढळला. त्यानंतर निवासी डॉक्टरांमध्ये या विषयावरून उलटसुलट चर्चा सुरू आहे. नेमकी काय घटना घडली?, याची चौकशी करा, अशी मागणी पालिका वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर संघटनेने (मार्ड) केली आहे.
डॉ. सौरभ धुमाळ यांचा मृत्यू रिॲक्शनमुळे झाला आहे की, यामागे वेगळे कारण आहे, अशी चर्चा निवासी डॉक्टरांमध्ये सुरू आहे. त्यांच्या बेडवर सलाइन, खोकल्याच्या औषधाची बाटली, गोळ्या आढळल्या.
मुंबई पालिका निवासी डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ. वर्धमान रोटे यांनी सांगितले की, अत्यंत दुर्दैवी अशी घटना सायन रुग्णालयात घडली आहे. निवासी डॉक्टरांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. सायन रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या पातळीवर चौकशी करून मृत्यूचे नेमके कारण शोधावे. डॉ. धुमाळ मानसिक तणावात होता का? याची सर्व माहिती घ्यावी, अशी आमची मागणी आहे.