- जमीर काझी मुंबई : वक्फ मंडळाच्या मालकीच्या मालमत्ता हडप करणाऱ्या संस्था, व्यक्तीवर दाखल गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) करावा, असा निर्णय महाराष्ट्र वक्फ बोर्डाकडून घेण्यात आला आहे. त्याबाबत गृह विभागाच्या विशेष प्रधान सचिवांची शिष्टमंडळाने भेट घेऊन मागणी केली आहे. वक्फ बोर्डाची मालमत्ता हडप केल्याप्रकरणी राज्यात १४ ठिकाणी गुन्हा दाखल आहे. याबाबत एका प्रकरणात ईडीकडे तक्रार करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर वक्फ मंडळाच्या कार्यकारिणीची बैठक आ. वजाहत मिर्झा यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी मुंबईत झाली. यावेळी खासदार इम्तियाज जलील, फौजिया खान यांच्यासह कार्यकारिणीचे अन्य सदस्य उपस्थित होते. ‘वक्फ’ची कोट्यवधीची मालमत्ता हडप प्रकरणी राज्य सरकार व भाजपच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपानंतर मंडळाची पहिलीच बैठक मुंबईत होत असल्याने त्यामध्ये कोणते निर्णय घेतले जातात, याकडे लक्ष लागून होते. यावेळी बनावट एनओसी बनवून मालमत्ता हडप केल्याबद्दलचा कसून छडा लावण्याबाबत एकमत झाले. त्याचप्रमाणे अपुऱ्या मनुष्यबळामुळे ‘वक्फ’च्या कामात विस्कळीतपणा आल्याने आवश्यक पदाची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव विशेष संजय सक्सेना यांच्याकडे एसआयटी नेमण्याबाबत व वित्त विभागाचे सचिव मनोज सौनिक यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन त्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली. शिष्टमंडळात सनैन शाकीर, समीर काझी, मुदस्सीर लांबे, खालीद बाबू कुरेशी, मौलाना अथर अली, ए. यू. पठाण आदींचा समावेश होता.
वक्फची मालमत्ता हडप केल्याप्रकरणी १४ ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. त्याचा तपास एसआयडीमार्फत करून आरोपीवर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. तसेच मंडळाचे कामकाज सुरळीत चालावे, यासाठी राज्यभरात २१४ पदे भरण्याची प्रकिया राबविली जाईल. - आ. डॉ. वजाहत मिर्झा, अध्यक्ष, वक्फ बोर्ड