सिद्धिविनायक मंदिरातील अनागोंदी कारभाराची चौकशी करा; मनसेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
By मनोहर कुंभेजकर | Published: December 14, 2022 01:23 PM2022-12-14T13:23:32+5:302022-12-14T13:24:03+5:30
कोरोना काळात प्रसादाकरिता 10 हजार लिटर तूप का मागविण्यात आले नंतर हे तूप इतर मंदिरांना दिले असे सांगितले जाते मग त्या मंदिरांनी त्याचा वापर कसा केला त्याची विक्री केली असेल तर त्याचा तपशील आहे का असा सवाल निवेदनात केला आहे
मुंबई- मुंबईतील प्रभादेवी येथील प्रसिद्ध असलेले सिद्धिविनायक मंदिर महाराष्ट्रातच नव्हे तर देशात पवित्र तीर्थक्षेत्र आहे. अशा पवित्र स्थानी चाललेल्या मनमानी व अनागोंदी कारभाराची चौकशी करावी अशी आग्रही मागणी मनसेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे केली आहे.
सिद्बिविनायक मंदिरात बाराही महिने भाविकांची गर्दी असते गरीब ते धनाढय सर्वचजण सिद्धिविनायकास सोने, चांदी आणी धन अर्पण करतात मात्र 2019 ते 2022 या कालावधीत न्यासाचे अध्यक्ष आणी काही विश्वस्तानी अनागोंदी कारभार केला असल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
कोरोना काळात प्रसादाकरिता 10 हजार लिटर तूप का मागविण्यात आले नंतर हे तूप इतर मंदिरांना दिले असे सांगितले जाते मग त्या मंदिरांनी त्याचा वापर कसा केला त्याची विक्री केली असेल तर त्याचा तपशील आहे का असा सवाल निवेदनात केला आहे. मंदिर नूतनीकारणासाठी तीन ते चार कोटी रुपयाच्या निविदा मागविण्यात आल्या हे काम 18 महिन्यात पूर्ण करण्याची अट होती त्यानंतर 10 हजार दंड लावण्यात येणार होता आजही ते काम पूर्ण का झाले नाही ? मग दंड का लावला नाही असा जाब मनसेने विचारला आहे.
कोरोना काळात सुरु केलेला क्यू आर कोड, मुख्यमंत्री सहाय्यता निधीत परस्पर देण्यात आलेला 5 कोटींचा निधी, शिवभोजन थाळी, कर्मचारी भरती व पदोन्नती अशा अनेक अनागोंदी कारभाराची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी या निवेदना द्वारे केल्याची माहिती किल्लेदार यांनी दिली.