मुंबई : देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यासह दोन निवृत्त सनदी अधिकारी रमेश अभिषेक व के. पी. कृष्णन यांच्याविरोधात सुरू असलेला सीबीआय तपास जलदगतीने करण्यात यावा, यासाठी ६३ मून टेक्नॉलॉजीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.चिदंबरम, रमेश अभिषेक, के.पी. कृष्णन यांच्या काही कृतींमुळे कंपनीचे नुकसान झाले. या सर्वांवर लाचलुचपत प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात यावा, यासाठी १५ फेब्रुवारी २०१९ रोजी कंपनीने सीबीआयकडे तक्रार नोंदवली होती. उच्च न्यायालयाला आश्वासन देऊनही सीबीआयने अद्याप या सर्वांवर गुन्हा नोंदवला नाही. गुन्हा नोंदवण्यास सीबीआय दिरंगाई करत असल्याने कंपनीने पुन्हा एकदा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सीबीआयकडे सहा वेळा जबाब नोंदवला तरी तक्रारीचे पुढे काय केले, हे अद्याप सांगण्यात आले नाही.कंपनीविरोधात कट कारस्थान करणाऱ्या चिदंबरम व दोन निवृत्त अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात न आल्याने सीबीआयला योग्य तेनिर्देश द्यावेत, अशी मागणी कंपनीने केली आहे. या याचिकेवरील सुनावणी १७ जुलै रोजी ठेवण्यात आली आहे.
चिदंबरम यांच्याविरोधातील तपास जलदगतीने करावा; ६३ मून टेक्नॉलॉजीची उच्च न्यायालयात धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 2:54 AM