‘भानू’ कारखान्याकडे परवाना नसल्याचे तपासात उघड, साकीनाका आग प्रकरणी चौकशी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 02:50 AM2017-12-20T02:50:00+5:302017-12-20T02:51:45+5:30
साकीनाका फरसाण कारखान्याला लागलेल्या आग प्रकरणी चौकशी सुरू झाली आहे. या कारखान्यात फरसाणचा व्यवसाय करण्यासाठी भानुशाली यांनी पालिकेकडून परवानाच घेतला नसल्याचे उजेडात आले आहे, तसेच केवळ पाच कामगारांची नोंदणी करून, १५ ते २० कामगारांच्या राहण्याची व्यवस्था केली होती. त्यामुळे या व्यावसायिकासह गाळ्याच्या मालकावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.
मुंबई : साकीनाका फरसाण कारखान्याला लागलेल्या आग प्रकरणी चौकशी सुरू झाली आहे. या कारखान्यात फरसाणचा व्यवसाय करण्यासाठी भानुशाली यांनी पालिकेकडून परवानाच घेतला नसल्याचे उजेडात आले आहे, तसेच केवळ पाच कामगारांची नोंदणी करून, १५ ते २० कामगारांच्या राहण्याची व्यवस्था केली होती. त्यामुळे या व्यावसायिकासह गाळ्याच्या मालकावरही कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईत असे सुमारे हजारहून अधिक फरसाण कारखाने सुरू असून, त्यांच्याकडे आवश्यक परवाना आहे का, याची तपासणी करण्याची मागणी जोर धरत आहे. त्यामुळे या कारखान्यांभोवती चौकशीचा फास आवळला जाण्याची शक्यता आहे.
१९७४ मध्ये बांधण्यात आलेला हा गाळा मखारिया या व्यक्तीच्या मालकीचा आहे. या ठिकाणी आधी बूट व्यवसाय, त्यानंतर तयार कपडे आणि आता फरसाण व्यवसाय सुरू करण्यात आला होता. गेल्या दीड वर्षांपासून रमेश भानुशाली या ठिकाणी फरसाण तयार करीत होते. मात्र, संबंधित मालक किंवा व्यावसायिकाने पालिकेकडे कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नव्हती. सन १९७१ च्या कायद्यांतर्गत हा गाळा असलेला विभाग झोपडपट्टी म्हणून जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे या गाळ्याला अनधिकृत ठरविता येत नसल्याचे समोर आले आहे. या कामगारांच्या सुरक्षेसाठी, तसेच आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पाडण्याकरिताही कोणतीही व्यवस्था येथे नव्हती. भाडेकरूला जागा देताना पोलिसांकडून पडताळणी करून घेणे बंधनकारक असताना, तेही मालकाने केले नसल्याचे उघडकीस आले आहे. साकीनाक्यातील ‘भानू’ कारखान्याला सोमवारी लागलेल्या आगीत १२ कामगारांचा मृत्यू झाला आहे.
जिवावर उदार होऊन काम
उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात आणि पश्चिम बंगाल येथून येणारे हे कामगार मुंबईतील किराणा दुकान, रेस्टॉरंट, बेकरी किंवा हिºयांना पैलू पडणारे कारखाने आधी ठिकाणी कामाला लागतात. मुंबईत भाड्याने घर घेणेही खर्चिक ठरत असल्याने, तसेच या कामगारांना आपल्या पगारातील काही रक्कम गावी आपल्या कुटुंबाला पाठवावा लागत असल्याने, धोका पत्करून, जिवावर उदार होऊन ते कामाच्या ठिकाणीच राहत असतात.
पालिका आयुक्तांनी माहिती मागविली-
कुर्ला येथील हॉटेल सिटी किनारामध्ये आॅक्टोबर २०१५ मध्ये भीषण आग लागून ८ विद्यार्थी मृत्युमुखी पडले होते. त्या वेळी अशा सर्व आस्थापनांच्या फायर आॅडिटचे आश्वासन पालिका प्रशासनाने दिले होते. मात्र, अद्याप त्या दिशेने कारवाई झालेली नाही. मुंबईतील अशा एक हजाराहून अधिक फरसाण कारखान्यांची चौकशी करून, त्यांच्याकडे परवाना आहे का? फायर आॅडिट नियमित करण्यात येत आहे का? याची पडताळणी तत्काळ करण्यात यावी, अशी मागणी भाजपाने पालिका आयुक्त अजय मेहता यांच्याकडे मंगळवारी केली. याबाबत अग्निशमन विभागाकडून माहिती मागविण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.