लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मंजुळा शेट्ट्ये हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात यावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. बॉलीवूड अभिनेता संजय दत्त याच्या सुटकेला आव्हान देणाऱ्या प्रदीप भालेकर यांनीच मंजुळा शेट्ट्येप्रकरणी याचिका दाखल केली आहे.२३ जून रोजी भायखळा कारागृहाची वॉर्डन मंजुळा शेट्ट्ये हिला किरकोळ कारणावरून मारहाण केल्याने तिचा मृत्यू झाला. सुरुवातीला मारहाणीमुळे तिची शुद्ध हरपली, तरीही कारागृह प्रशासनाने तिला रुग्णालयात दाखल केले नाही. शुद्ध हरपल्यानंतर काही तासांतच शेट्ट्येला मृत घोषित करण्यात आले. सध्या या प्रकरणाचा तपास नागपाडा पोलीस ठाणे करत आहे. मात्र, तपास संशयास्पद असून, पुराव्यांशी छेडछाड करण्यात येत आहे. त्यामुळे हा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात यावा, अशी विनंती भालेराव यांनी केली. भालेकर यांनी केलेल्या याचिकेनुसार, शेट्ट्येने कारागृहातील भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठविल्याने, तिला अशी वागणूक देण्यात आली. भायखळा कारागृहात महिला कैदी/आरोपींना मारहाण करण्यात येते. याचेच उदाहरण म्हणजे, नागपूरची सुषमा रामटेके. नक्षलवाद्यांना मदत केल्याबद्दल रामटेकेला अटक करण्यात आली. भालेकर यांनी याचिकेत शीना बोरा हत्येप्रकरणातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी व अन्य कैदी/आरोपींचाही उल्लेख केला आहे. कारागृहात कैद्यांना/आरोपींना वेळेवर उपचार मिळत नाहीत. त्यांना योग्य त्या सुविधा मिळाव्यात व त्यांच्या तक्रारीही ऐकण्यात याव्यात, यासाठी तक्रार निवारण मंच असावा, अशी मागणी याचिकेत आहे.
तपास सीआयडीकडे वर्ग करण्याची मागणी
By admin | Published: July 02, 2017 4:19 AM