Join us  

चित्रपट महामंडळाच्या कारभाराची होणार चौकशी

By admin | Published: February 05, 2017 12:46 AM

चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांच्या काळात सुर्वे यांच्यासह संचालकांवर सभासदांनी आर्थिक गैरव्यवहारांचा आरोप केला

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट मंडळात सन २०१० ते २०१५ या सालातील आर्थिक व्यवहारांची चौकशी धर्मादाय आयुक्त कार्यालयातर्फे करण्यात येणार आहे. चित्रपट महामंडळाच्या कारभाराच्या चौकशीचा आदेश निघून तब्बल आठ महिने लोटल्यानंतर ही कारवाई करण्यात येणार आहे.चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांच्या काळात सुर्वे यांच्यासह संचालकांवर सभासदांनी आर्थिक गैरव्यवहारांचा आरोप केला होता. याविरोधात मोठे आंदोलन उभे राहिले होते. कार्यकारिणीविरोधात त्यावेळी रणजित जाधव, भास्कर जाधव, विजय शिंदे, प्रमोद शिंदे यांच्यासह काही सदस्यांनी सहधर्मादाय आयुक्तांकडे २०१०-१५ या कालावधीत महामंडळात झालेल्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली होती. या याचिकेवर झालेल्या सुनावणीत कोल्हापूर विभागाच्या धर्मादाय सहआयुक्त निवेदिता पवार यांनी ६ मे २०१६ रोजी धर्मादाय आयुक्त सुरेंद्र वडगावकर यांना चौकशीेचे आदेश दिले व हा अहवाल तीन महिन्यांत सादर करण्याचे सूचित केले. मात्र या आदेशाला तब्बल आठ महिने लोटल्यानंतरही कोणतीही चौकशी करण्यात आली नाही. सदर याचिका दाखल केलेल्या सभासदांनी हा चौकशीचा आदेश मिळविला व संबंधित अधिकाऱ्यांना याबद्दलची माहिती विचारली. मात्र आठ महिन्यांनी का असेना, आता त्या पाच वर्षांतील महामंडळातील आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्याच वतीने लेखापरीक्षकाची नेमणूक करण्यात येण्याची शक्यता आहे. चित्रपट महामंडळात २०१०-१५ या पाच वर्षांत झालेल्या आर्थिक व्यवहारांची चौकशी व्हावी, यासाठी सदर याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र चौकशीचा आदेशच आठ महिन्यांनी बाहेर आला आहे. धर्मादाय आयुक्तांच्या वतीनेच लेखापरीक्षक नेमून चौकशी होणार आहे. - मेघराज भोसले, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळपाच वर्षांपूर्वी आम्ही संचालक मंडळात नव्हतो. त्या काळात झालेल्या गैरव्यवहाराविरोधात आम्ही आंदोलन उभारले होते. त्याचा परिणाम म्हणून चौकशीचा आदेश निघाला. मात्र तो दडविण्यात आला. आता जर यावर कार्यवाही झाली नाही तर आम्ही राज्याच्या धर्मादाय आयुक्तांकडे दाद मागू. - धनाजी यमकर, उपाध्यक्ष, चित्रपट महामंडळ