वरळी सी-लिंकवरील अपघाताची चौकशी सुरुय; शिंदेंचं ट्विट, मात्र ट्विटला रिप्लाय देणाऱ्याची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 03:44 PM2022-10-05T15:44:52+5:302022-10-05T15:52:21+5:30
या अपघतात पाच जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
मुंबई- वांद्रे-वरळी सी लिंकवर आज पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांपैकी तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.
वांद्रेहून वरळीच्या दिशेने जाणाऱ्य मार्गावर हा अपघात झाला आहे. एका मागून एक गाड्या एकमेकांवर आदळल्या. पहाटे साडे तीनच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत अपघाताची चौकशी सुरु असल्याची माहिती दिली आहे.
एकनाथ शिंदे ट्विट करत म्हणाले की, वांद्रे-वरळी सी-लिंक वर झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अपघाताची अधिक चौकशी सुरु असून पुढील कारवाई केली जाईल, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
वांद्रे-वरळी सी-लिंक वर झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अपघाताची अधिक चौकशी सुरु असून पुढील कारवाई केली जाईल.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 5, 2022
एकनाथ शिंदे यांच्या ट्विटला किरण अशोक कांबळे या युजर्सने रिप्लाय देत मी या अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तीचा भाऊ असल्याचं म्हटलं आहे. तसेच आता पूर्ण १२ तास ओलांडून गेले आहे. परंतु अजून आम्हास काहीच प्रतिउत्तर नाही मिळाले.माझं संपूर्ण कुटुंब झालेल्या प्रकाराला आणि होत असलेल्या उशिरास त्रासलेलो आहोत, अशी भावना या युजर्सने व्यक्त केली आहे. या रिप्लायची चर्चा आथा सोशल मीडियावर रंगली आहे.
दरम्यान, वांद्रे वरळी सी लिंकवर एका गाडीचा आधीच अपघात झाला होता. त्या अपघातातील जखमींना नेण्यासाठी रुग्णवाहिकेला बोलावण्यात आले होते. मात्र ही रुग्णवाहिका जखमींना घेऊन जाण्यापूर्वी तीन अजून कारनी येऊन रुग्णवाहिकेला धडक दिली. त्यामुळे सी लिंकवर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. य़ादरम्यान, अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. तसेच सी लिंक काही काळासाठी बंद करण्यात आला होता.
वांद्रे-वरळी सी-लिंकवर भीषण अपघात, ५ जणांचा मृत्यू, १० जण जखमी, मदतीसाठी आलेल्या रुग्णवाहिकेला कारची धडक pic.twitter.com/K5H339WvF8
— Lokmat (@lokmat) October 5, 2022