Join us

'जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचारामुळेच दुष्काळाच्या झळा तीव्र'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 11:54 AM

जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचारामुळेच दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. राज्यात विविध भागात वाढत असलेली टँकरची संख्या जलयुक्त शिवार योजनेचे सपशेल अपयश दर्शवणारी आहे - सचिन सावंत

ठळक मुद्देजलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचारामुळेच दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या आहेत.राज्यात विविध भागात वाढत असलेली टँकरची संख्या जलयुक्त शिवार योजनेचे सपशेल अपयश दर्शवणारी - सचिन सावंतसद्य स्थितीत नोव्हेंबर महिन्यात राज्यात टँकरच्या संख्येत झालेली वाढ चक्रावून टाकणारी आहे.

मुंबई - जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचारामुळेच दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. राज्यात विविध भागात वाढत असलेली टँकरची संख्या जलयुक्त शिवार योजनेचे सपशेल अपयश दर्शवणारी आहे अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

या संदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, सद्य स्थितीत नोव्हेंबर महिन्यात राज्यात टँकरच्या संख्येत झालेली वाढ चक्रावून टाकणारी आहे. या वर्षी राज्यात जवळपास ७४.४ टक्के पाऊस पडला ही वस्तुस्थिती आहे. पाणीपुरवठा विभागाच्या आकडेवारीनुसार १७ नोव्हेंबर २०१८ पर्यंत राज्यात एकूण ७१५ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

२०१४ साली राज्यात ७०.२ टक्के म्हणजे यावर्षीपेक्षा कमी पाऊस पडला होता. त्यावेळी १७ नोव्हेंबर २०१४ च्या आकडेवारीनुसार राज्यात केवळ ७१ टँकर सुरु होते. २०१५ साली राज्यात त्याहीपेक्षा कमी म्हणजेच ५९.४ टक्के पाऊस पडला होता. १६ नोव्हेंबर २०१५ च्या आकडेवारीनुसार त्यावेळेस ६९३ टँकर राज्यात सुरु होते. यातूनच जलयुक्त शिवार योजनेत हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध होत असून या योजनेवर खर्च झालेले ७ हजार ७८९ कोटी रूपये हे जलयुक्त शिवारच्या खड्ड्यांमध्ये मुरले का? असा संतप्त सवाल सावंत यांनी सरकारला विचारला आहे.

हजारो कोटी खर्च करूनही राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाही सरकार असक्षम असेल तर या प्रकरणाची तात्काळ न्यायालयीन चौकशी करावी व जलसंधारण मंत्र्यांनी या भ्रष्टाचाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सावंत यांनी केली.

टॅग्स :सचिन सावंतकाँग्रेसभाजपा