Join us  

पालिकेच्या १२ हजार कोटींच्या व्यवहारांच्या चौकशीस सुरुवात, कॅगकडून कोरोना काळातील कागदपत्रांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 1:51 PM

कंट्रोलर ऑफ ऑडिटर जनरल ऑफ इंडिया (कॅग) या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून महापालिकेत कोरोना काळात झालेल्या कामांच्या वाटपाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते.

मुंबई: महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला कोंडीत पकडण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या मागणीनंतर कोरोना काळातील महापालिकेच्या व्यवहारांची कॅगकडून चौकशी सुरू झाली आहे. कॅगचे पथक मंगळवारी महापालिका मुख्यालयात आले होते. त्यांनी काही कागदपत्रांची मागणी केल्याचे सूत्रांनी सांगितले. कंट्रोलर ऑफ ऑडिटर जनरल ऑफ इंडिया (कॅग) या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून महापालिकेत कोरोना काळात झालेल्या कामांच्या वाटपाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते.

काही कागदपत्रेही ताब्यात घेतली -सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी कॅगचे एक पथक महापालिका मुख्यालयात दाखल झाले होते. १२ हजार कोटींच्या व्यवहारांच्या अनुषंगाने कॅगच्या अधिकाऱ्यांनी विविध विभागातील व्यवहारांच्या कागदपत्रांची मागणी केल्याचे समजते. कॅगच्या पथकाने महापालिकेच्या लेखा विभागाकडून व्यवहारांची माहिती मागितली असून, त्या व्यवहारांची काही कागदपत्रेही ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून निविदा प्रक्रिया न राबविता कंत्राटे, साहित्य खरेदी करण्यात आले होते, असा आक्षेप आहे. महापालिकेच्या दहा खात्यांतून झालेले व्यवहार कॅगच्या रडारवर असणार आहेत.

कोणत्या व्यवहाराची चौकशी?कॅगकडून २८ नोव्हेंबर २०२० ते २८ फेब्रुवारी २०२२ या काळात झालेल्या व्यवहारांची चौकशी केली जाणार आहे. या काळात गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपकडून सातत्याने केला जात होता.

हे व्यवहार रडारवर-    रुग्णालयांसाठी करण्यात आलेली खरेदी-    सांडपाणी प्रकल्पांवरील खर्च-    घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांवरील खर्च-    रस्त्यांच्या दुरुस्तीवरील खर्च-    पुलांच्या बांधकामावरील खर्च-    दहिसर येथील भूखंडाची खरेदी-    मलनि:सारण प्रक्रिया केंद्रावरील खर्च

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामुंबई