Join us

"पोलिसांच्या तपासातील त्रुटी दखलपात्र"; कोर्टाच्या आदेशानंतर अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण CBI कडे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2024 4:26 PM

मुंबई हायकोर्टाने अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग केला आहे.

Abhishek Ghosalkar Case: शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणात मुंबई हायकोर्टाने महत्त्वाचा निर्णय घेतला. अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर यांनी केलेल्या याचिकेची दखल घेऊन हायकोर्टाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग केला आहे. यावेळी मुंबई हायकोर्टाने या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांना झापले. मुंबई पोलिसांनी तपासात केलेल्या त्रुटी या दखलपात्र असल्याचे म्हणत कोर्टाने या प्रकरणाचा तपास सीबीआयने करण्याचे निर्देश दिले आहेत.

अभिषेक यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा तपास मुंबई पोलिसांनी गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. त्यावेळी तपास योग्य पद्धतीने होत नसल्याचे म्हणत घोसाळकर कुटुंबियांनी याचिका दाखल केली. पोलिसांवर राजकीय दबाव असल्याने त्यांच्याकडे तपास देऊ नये असे घोसाळकर कुटुंबियांनी म्हटलं होतं. त्यानंतर कोर्टाने आता हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं आहे. 

माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मॉरिस नोरान्हा उर्फ मॉरिसभाईने गोळीबार करुन हत्या केली होती. जुना वाद मिटवत असल्याचे म्हणत  मॉरिस नोरान्हाने फेसबुक लाईव्हवर अभिषेक घोसाळकर यांना बोलवलं होतं. त्यानंतर फेसबुक लाईव्ह सुरु असताना मॉरिस नोरान्हाने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबार घोसाळकर यांचा मृत्यू झाला. त्यानंतर बाहेर येऊन मॉरिस नोरान्हाने स्वतःवरही गोळ्या झाडत आत्महत्या केली. या सगळ्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली होती.

त्यानंतर या प्रकरणात अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येच्या कटातील सूत्रधारांची पोलिसांकडून पाठराखण केली जातेय आणि योग्य तपास करण्यात पोलिस यंत्रणा सपशेल अपयशी ठरली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) सोपवण्याचे निर्देश द्या, अशी याचिका माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी केली होती. अभिषेक यांच्या हत्येचा कट रचणारे खरे सूत्रधार अजून मोकाट आहेत. अभिषेक यांच्या हत्येच्या कटातील मुख्य आरोपी- सूत्रधारांचा मागोवा घेण्याच्या दृष्टीने पोलिसांनी गांभीर्याने तपास केलेला नाही. त्यामुळे खरे सूत्रधार अद्याप मोकाट आहेत. असे असताना पोलिसांनी घाईघाईत आरोपपत्र दाखल केले, असा युक्तीवाद तेजस्विनी घोसाळकरांकडून करण्यात आला.

टॅग्स :मुंबादेवीउच्च न्यायालयगुन्हा अन्वेषण विभागमुंबई पोलीसअभिषेक घोसाळकर