फुकटच्या जेवणावर ताव मारणाऱ्यांची चौकशी; कामगार मंत्री सुरेश खाडे यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 06:02 AM2023-07-25T06:02:17+5:302023-07-25T06:02:30+5:30
या योजनेत कोट्यवधी घोटाळे झाले असल्याचा आरोप विरोधी पक्ष सदस्यांनी यावेळी केला.
मुंबई : राज्यातील बांधकाम मजुरांसाठी असलेली मध्यान्ह भोजन आणि कामगारांना वाटण्यात येणाऱ्या किटमधील कथित गैरव्यवहारांची राज्य कामगार आयुक्तांमार्फत चौकशी केली जाईल, अशी घोषणा कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी विधानसभेत केली. या योजनेत कोट्यवधी घोटाळे झाले असल्याचा आरोप विरोधी पक्ष सदस्यांनी यावेळी केला.
धाराशिव जिल्ह्यातील मध्यान्ह योजनेतील गैरव्यवहारांबाबतचा प्रश्न कैलास घाडगे पाटील यांनी उपस्थित केला होता. त्यावर, गैरव्यवहार झाला नसल्याचा दावा खाडे यांनी केला. मात्र, या योजनेवर दरवर्षी साडेतीनशे कोटी रुपये खर्च केले जातात पण निविदेत नमूद केल्यानंतर संतुलित आहार दिला जात नाही, अधिकची लाभार्थी संख्या दाखविली जाते, असा हल्लाबोल काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी केला.
निविदेनुसार हे भोजन दिले जात असेल तर आपण राजकारण सोडू, असे आव्हान ज्येष्ठ सदस्य अनिल देशमुख यांनी दिले . विधान परिषदेतही यावर चर्चा झाली. अभिजित वंजारी, शशिकांत शिंदे यांनी हा प्रश्न उपस्थित केला.
किट ८ हजाराला
लाखो कामगारांना सुरक्षा किट वाटल्या. बाजारात एका किटची किंमत १२०० रुपये असताना ८ हजार रुपये पुरवठादाराला दिले गेले असा आरोप अनिल देशमुख यांनी केला. त्यावर या दोन्हींची कामगार आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येईल, असे मंत्री खाडे यांनी सांगितले. किटमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या वस्तू असतात, सर्वात कमी दराची निविदा मंजूर करूनच कंत्राट दिलेले होते, असेही मंत्री खाडे म्हणाले.