मुंबई : माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची एसआरए घोटाळाप्रकरणी दादर पोलिसांनी शुक्रवारी चौकशी केली. तसेच शनिवारी पुन्हा चौकशीला बोलाविण्यात आले आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
दादर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसआरएमध्ये घर देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी जूनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पालिका अधिकाऱ्याच्या संगनमताने ही फसवणूक झाली. यामध्ये चार जणांना अटकही करण्यात आली. यामध्ये पेडणेकर यांच्या जवळच्या व्यक्तीसह पालिका कर्मचाऱ्याचा समावेश आहे.
त्याच्याच जबाबात पेडणेकर यांच्या नावाचा उल्लेख झाल्याची माहिती समोर येत आहे. दाखल गुन्ह्यात आरोपींमध्ये किशोरी पेडणेकर यांचे नाव नाही. सध्या याच प्रकरणात त्यांच्यावर होत असलेले आरोप आणि समोर आलेल्या माहितीच्या आधारे त्यांना चौकशीला बोलाविण्यात आले होते. त्यानुसार, चौकशी करत पुन्हा काही कागदपत्रांसह शनिवारी बोलाविण्यात आले आहे.
९ जणांची फसवणूकदाखल गुन्ह्यात एकूण ९ तक्रारदारांची फसवणूक झाली आहे. त्यांच्याकडून पैसे उकळूनही त्यांना घरे देण्यात आली नसल्याचा आरोप आहे. आरोपींच्या चौकशीत यांच्याकडून घेतलेले पैसे पेडणेकर यांनाही दिल्याच्या माहितीवरून ही चौकशी होत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.