शिवाजी पार्क राडाप्रकरणी महेश सावंतची चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 08:55 AM2023-11-21T08:55:39+5:302023-11-21T09:30:44+5:30
सीसीटीव्हीच्या मदतीने तपासाला सुरुवात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राडाप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने ठाकरे गटाचे विभागप्रमुख महेश सावंत यांना नोटीस पाठवून सोमवारी चौकशी केली. त्यानुसार, सावंत सोमवारी चौकशीला हजर झाले. शिवाजी पार्क पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी मुरकुटे यांनी सध्या एकालाच नोटीस बजावत तपास सुरू असल्याचे सांगितले.
बाळासाहेब स्मृतिस्थळावर नेमकं काय घडलं, याबाबत आजूबाजूला असलेल्या सीसीटीव्ही आणि रेकॉर्डिंगवरून चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनीच फिर्यादी होत ५० ते ६० अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. घटनास्थळी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनीही रेकॉर्डिंग केले आहे. त्याच रेकॉर्डिंगच्या आधारे गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू आहे.
म्हणून राडा झाला...
पोलिसांनी आम्हाला नोटीस दिली होती. दंगल घडविण्यासारखे गुन्हे आमच्यावर लावले आहेत. त्यानुसार, राड्याबाबत माहिती देण्यासाठी आलो होतो. सध्या विभागप्रमुख म्हणून मलाच नोटीस दिली आहे.
अजून कोणी तक्रार केलेली नाही, पोलिसांनीच तक्रार दाखल केली आहे. आम्ही २०१३ पासून बैठक घेत कार्यक्रमाचा आढावा आम्ही घेत असतो. त्या दिवशी आम्हाला समजले सीएम येणार आहेत, आम्ही वरिष्ठ नेत्यांना सांगितले.
आम्ही साडेतीन तास वेटिंगला होतो. म्हणून तिकडे गेलो आणि आमचे वरिष्ठ नेते माध्यमांशी बोलत असताना, नरेश म्हस्के आले आणि ते तिथेच थांबून अडून बसले होते. म्हणून हा राडा झाला.
आम्ही म्हस्के यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केल्याचे सावंत यांनी, पोलिसांना माहिती देऊन पोलिस ठाण्यातून बाहेर पडताना माध्यमांशी बोलताना सांगितले.