लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाकाळात ऑक्सिजन प्लँटशी संबंधित दिलेले काम वेळेत पूर्ण केले नसतानाही तसे भासवत सहा कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या मेसर्स हायवे कंपनीच्या रोमिन छेडा यांची गुरुवारी आर्थिक गुन्हे शाखेकडून आठ तास चौकशी करण्यात आली.
आर्थिक गुन्हे शाखेकडून बुधवारी रात्री नागपाडा पोलिस ठाण्यात याप्रकरणी छेडासह संबंधित पालिका अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेंग्विनच्या कंत्राटमुळे वादग्रस्त ठरलेल्या मेसर्स हायवे कंपनीची पात्रता नसतानाही या कंपनीला पालिकेची ९ रुग्णालये आणि जम्बो कोविड सेंटरमध्ये कंत्राट देण्यात आले होते. कंपनीने ठरलेल्या वेळेत काम पूर्ण केले नाही. मात्र, २०२१ मध्ये काम पूर्ण झाल्याचे दाखवून सहा कोटींची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामध्ये बनावट पत्राचा वापर केल्याचेही नमूद आहे. ही कंपनी ठाकरे कुटुंबीयांच्या जवळ असल्याने तिला कंत्राट दिले जात असल्याचे आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात आले होते. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा संबंधितांचा लेखाजोखा तपासत आहे. यापूर्वी कोरोनाकाळातील विविध घोटाळ्याप्रकरणी गुन्हे नोंदवत आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे.