Join us

कर्नाटकात पसार झालेल्या संशयितावर तपास केंद्रीत

By admin | Published: May 24, 2015 1:58 AM

कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे फरार संशयितावर लक्ष केंद्रीत केले आहे.

डिप्पी वांकाणी - मुंबईकम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे फरार संशयितावर लक्ष केंद्रीत केले आहे. सीसीटीव्हीची दृश्ये इंग्लंडहून अधिक स्पष्ट स्वरुपात मिळाली असून त्याआधारे कर्नाटकात पसार झालेल्या संशयिताचा शोध घेण्यात येत आहे.गत १६ मार्च रोजी पानसरे हे पत्नी उमा यांच्यासमवेत सकाळी फिरायला गेले असता अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. गोविंद पानसरे यांच्या मानेवर आणि छातीवर तीन गोळ्या झाडल्या होत्या. यात ते गंभीर जखमी झाले होते. मुंबईतील ब्रीच कँडी इस्पितळात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याची दृश्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याने टिपली होती.यातील दृश्याचे शास्त्रीय विश्लेषण करण्यासाठी सीसीटीव्हीचे फुटेज लंडनला पाठविण्यात आले होते. ही दृश्ये अधिक मोठी करून मिळाली असून त्याआधारे कर्नाटकात पसार झालेल्या संशयिताचा माग घेतला जात आहे. या घटनेनंतर हा संशयित कर्नाटकात पसार झाला होता. कायदा आणि सुव्यवसस्था विभागातील एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आम्ही कर्नाटक पोलिसांच्या संपर्कात आहोत, असे कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजीव कुमार यांनी ‘लोकमत’ला सांगितले. तथापि, त्यांनी याबाबत अधिक तपशील देण्याचे टाळले. अतिरिक्त पोलीस महांसचालक (कायदा-सुव्यवस्था) के. एल. बिष्णोई यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला असता त्यांनी संजीव कुमार यांच्या सूरात सूर मिसळला. या प्रकरणी चौकशी सुरू असल्याने काही ठोस माहिती मिळाल्यास ती माध्यमांना कळविली जाईल, असेही ते म्हणाले.