वरळी बांधकाम विभागातील घोटाळे चौकशीत उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 05:17 AM2018-03-14T05:17:12+5:302018-03-14T05:17:12+5:30
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मध्य मुंबई विभागात (वरळी) केवळ ४९ प्रकरणांची चौकशी केली असता लाखो रुपयांचे घोटाळे समोर आले असून आता हे प्रकरण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात येणार आहे.
- यदु जोशी
मुंबई : सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मध्य मुंबई विभागात (वरळी) केवळ ४९ प्रकरणांची चौकशी केली असता लाखो रुपयांचे घोटाळे समोर आले असून आता हे प्रकरण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात येणार आहे. या प्रकरणी तत्कालीन कार्यकारी अभियंता ए. जे. पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कंत्राटदार वादाच्या भोव-यात सापडले आहेत.
या विभागांतर्गत अनेक शासकीय कार्यालयांच्या तसेच शासकीय निवासस्थानांच्या इमारती येतात. भाजपाचे गंगापूर-खुलताबादचे आमदार प्रशांत बंब आणि तुमसरचे आमदार चरण वाघमारे यांनी या विभागात झालेल्या घोटाळ्यांबद्दल तक्रारी केल्या होत्या. ए.जे. पाटील हे कार्यकारी अभियंता असताना जानेवारी २०१७ ते मार्च २०१७ या केवळ तीन महिन्यांच्या काळात २४ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला, असे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. पाटील हे नंतर सेवानिवृत्त झाले. ‘आमच्या तक्रारींपैकी काही प्रकरणांची चामलवार समितीने नमुना म्हणून चौकशी केली. गेल्या पाच वर्षांत वरळी विभागातील घोटाळ्यांची चौकशी केली तर कोट्यवधी रुपयांचे घोटाळे समोर येतील, असे मत या दोन्ही आमदारांनी आज ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
दोन्ही आमदारांच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी बांधकाम खात्याच्या दक्षता पथक मंडळाचे (मुंबई) अधीक्षक अभियंता धनंजय चामलवार यांनी चौकशी अहवाल दिला. या अहवालात काही प्रकरणांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे.
या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात संबंधित व कंत्रादारांविरोधात तक्रार दाखल करण्याचे आदेश बांधकाम खात्याच्या मुंबई मंडळाचे अधीक्षक अभियंता ए.बी. सूर्यवंशी यांनी मंगळवारी वरळी विभागाचे उप कार्यकारी अभियंता हेमंत पाटील यांना दिले.
>खिडक्या, काचाही खाल्ल्या
जे.जे. स्कूल आॅफ आर्टस्च्या संचालकांच्या व प्राचार्यांच्या कार्यालयातील रंगकामात कंत्राटदारास जादा पैसा दिला.
माझगावमधील जुन्या विक्रीकर कार्यालयातील दालनांच्या दुरुस्तीत कंत्राटदारास जादा पैसा दिला.
डीएसआयएस; माटुंगा येथील डिस्पेंसरी हॉलच्या कामात घोटाळे परळ येथील लेबर इन्स्टिट्यूटच्या दुरुस्ती कामात कंत्राटदारास अतिरिक्त पैसा दिला.
किंग्ज सर्कल येथील रेशनिंग कार्यालयाच्या दुरुस्तीच्या कामात भ्रष्टाचार
गोखले रोड पोलीस कम्पाउंडमधील एसआरपीएफ बरॅकमध्ये छताला एसी शिट लावणे, नवीन दरवाजे, खिडक्या बसविणे ही कामे न करताच बिले देण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वरळी कार्यालयातील दुरुस्तीचे कामही घोटाळ्यातून सुटले नाही.
एसआरपीएफच्या नायगाव येथील इमारतीत कामे न करता बिले काढण्यात आली.
आर्थर रोड जेलमध्ये दरवाजे, खिडक्या न लावताच कंत्राटदारांना पैसा देण्यात
आला.