हॉस्टेलमधील गुंतवणूक व्यावसायिकाला महागात; नऊ कोटी ४४ लाख रुपयांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 07:30 AM2024-07-01T07:30:46+5:302024-07-01T07:31:11+5:30
जुहू येथील ५४ वर्षीय तक्रारदाराचा कन्सल्टिंग, इन्व्हेस्टमेंट बँकरचा व्यवसाय आहे. २०१० मध्ये त्यांची ओळख बँकेचा शाखा व्यवस्थापक शोभीत मलेटाशी झाली.
मुंबई - उत्तराखंडच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलमध्ये केलेली गुंतवणूक एका व्यावसायिकाला महागात पडली आहे. आरोपींनी त्यांची ९ कोटी ४४ लाख रुपयांना फसवणूक केली आहे.
जुहू येथील ५४ वर्षीय तक्रारदाराचा कन्सल्टिंग, इन्व्हेस्टमेंट बँकरचा व्यवसाय आहे. २०१० मध्ये त्यांची ओळख बँकेचा शाखा व्यवस्थापक शोभीत मलेटाशी झाली. शोभीतने तो उत्तराखंडचा रहिवाशी असल्याचे सांगून तेथे शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहांची कमतरता आहे. जागा खरेदी करून वसतिगृह बांधल्यास मोठा फायदा होईल, अशी भूलथाप देऊन तक्रारदाराला गुंतवणूक करण्यास भाग पाडले. २०१५ मध्ये त्याने कायमस्वरूपी गावी जात असल्याचे सांगत पुन्हा जागाखरेदीचा प्रस्ताव तक्रारदारासमोर ठेवला आणि नियोजित जागेचे सर्वेक्षण करण्याचे काम एका कंपनीला दिले.
कंपनीकडून सकारात्मक अहवाल येताच तक्रारदाराने त्यावर विश्वास ठेवला. जून २०१६ मध्ये इंडी कॅम्पस स्टुडंट अकोमोडेशन डीडी-१ प्रा. लि. नावाची कंपनी सुरू करून शोभीत मलेटा आणि रमेश मुलाशी हे संचालक बनले. याच कंपनीमार्फत देहरादून जागा खरेदी आणि वसतिगृह बांधकाम यासाठी एकूण आठ कोटी २९ लाख ८९ हजार ८८४ रुपयांचे कर्ज इंडिया बुल्स कंपनीकडून मंजूर करून कंपनीला दिले. कर्जाचा मासिक हप्ता १२ लाख ६१ हजार २९८ रुपये तक्रारदार भरू लागला.
खोटी कागदपत्रे, समांतर बँक खाते
वसतिगृह बांधून झाल्यानंतर विद्यार्थी तेथे राहायला येऊ लागले. मात्र, तेथील व्यवहारांबाबत माहिती देण्यास शोभीत टाळाटाळ करू लागला.
तक्रारदाराने सीएला पाठवून तपासणी करण्यास सांगितले असता शोभीतने खोटी कागदपत्रे सादर केल्याचे आणि कंपनीच्या नावाशी मिळत्याजुळत्या नावाने आणखी एक बँक खाते उघडून त्यावर विद्यार्थ्यांकडून फी घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने पोलिसांत तक्रार दिली. त्याने आपली ९ कोटी ४४ लाख रुपयांना फसवणूक करण्यात आल्याचे म्हटले आहे. वांद्रे पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.