Join us

देशात मालमत्तेतील गुंतवणुकीला ओहोटी; लंडनमधील मालमत्ता सर्वात महागड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2020 6:08 AM

गुंतवणूक २०१७ (५० हजार ६०० कोटी) आणि २०१८ (५२ हजार ९७९) या वर्षांच्या तुलनेने लक्षणीयरीत्या घटल्याची माहिती समोर आली आहे. या गुंतवणुकीमध्ये ५३ टक्के वाटा हा निवासी मालमत्तांचा असून ४७ टक्के व्यावसायिक मालमत्ता आहेत.

मुंबई : निवासी आणि व्यावसायिक मालमत्ता खरेदी करण्यासाठी २०१९ साली भारतातील गुंतवणूकदारांनी ४५ हजार ६८० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मात्र, ही गुंतवणूक २०१७ (५० हजार ६०० कोटी) आणि २०१८ (५२ हजार ९७९) या वर्षांच्या तुलनेने लक्षणीयरीत्या घटल्याची माहिती समोर आली आहे. या गुंतवणुकीमध्ये ५३ टक्के वाटा हा निवासी मालमत्तांचा असून ४७ टक्के व्यावसायिक मालमत्ता आहेत.जागतिक पातळीवर कार्यरत असलेल्या नाइट फ्रँक या सल्लागार संस्थेचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेल्थ रिपोर्ट गुरुवारी प्रसिद्ध झाला. त्यातून ही माहिती हाती आली आहे. गेल्या वर्षभरात जी मालमत्ता खरेदी झाली आहे त्यापैकी २० टक्के मालमत्ता ही अतिश्रीमंत गटातील भारतीयांनी घेतलेली आहे. यंदाच्या वर्षात त्यात ४ टक्क्यांनी वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.या गटातील भारतीयांचा इंग्लंड, अमेरिका, यूएई, सिंगापूर आणि आॅस्ट्रेलिया या देशांतील मालमत्तांमध्ये गुंतवणूक करण्याकडेही ओढा आहे. उर्वरित ६४ टक्के गुंतवणूकदारांनी स्थानिक पातळीवरील पायाभूत आणि वैद्यकीय सुविधा, हवेची गुणवत्ता, मनोरंजनाची ठिकाणे, पर्यावरणस्नेही वातावरण यांना प्राधान्य देत गृहखरेदी केली आहे.देशातील श्रीमंतांना २०१५ साली १० लाख डॉलर्समध्ये मुंबईत ९९ चौरस मीटर जागा खरेदी करता येत होती. त्याच पैशात आता १०२ चौरस मीटर जागा खरेदी करता येत असल्याचे हा अहवाल सांगतो. त्यामुळे उच्चभ्रू लोकांच्या घरांच्या किमतीत घट झाल्याचेही निदर्शनास येत आहे. मोनॅको, हाँगकाँग आणि लंडन या तीन शहरांतील मालमत्ता सर्वात महागड्या आहेत.>मुंबईत सर्वात कमी वाढजागतिक बाजारपेठेत मालमत्तांच्या किमतींमध्ये सरासरी १.८ टक्क्यांनी वाढ होत असून मुंबईत ते प्रमाण जेमतेम ०.५ टक्के इतके आहे. त्या तुलनेत दिल्ली (४.७) आणि बंगळुरू (२.१) येथील वाढ जास्त आहे. युरोपच्या फ्रँकफर्ट शहरात सर्वाधिक १० टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. या वाढीत मुंबईचा ६८ वा क्रमांक लागला आहे.