लोकमत मीडियाने गुलबदन टॉकिजमध्ये केली गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 06:16 AM2019-04-16T06:16:54+5:302019-04-16T06:40:39+5:30

लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या मल्टि-प्लॅटफॉर्म मीडिया कंपनीने मुंबईतील गुलबदन टॉकिज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील मोठा भांडवली हिस्सा खरेदी केला आहे.

Investments made by Lokmat Media in Gulabdan Talkies | लोकमत मीडियाने गुलबदन टॉकिजमध्ये केली गुंतवणूक

लोकमत मीडियाने गुलबदन टॉकिजमध्ये केली गुंतवणूक

Next

मुंबई : लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या मल्टि-प्लॅटफॉर्म मीडिया कंपनीने मुंबईतील गुलबदन टॉकिज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील मोठा भांडवली हिस्सा खरेदी केला आहे. भारतीय डिजिटल पार्टी (भाडिपा) या अग्रगण्य मराठी डिजिटल कंटेन्ट ब्रँडची मालकी गुलबदन टॉकिज प्रा. लि.कडे आहे.
भाडिपा, भा२पा, विषय खोल या तीन चॅनेलकडून विनोदी, पर्यटन, संगीत तसेच राजकीय विषयांवरील माहिती व मनोरंजनपर कार्यक्रमांची निर्मिती केली जाते. मराठीमध्ये स्टँड-अप कॉमेडीची सुरुवात भाडिपाने केली. तो कार्यक्रम १५ पेक्षा जास्त कलाकार सादर करतात. गुलबदन टॉकिज प्रायव्हेट लिमिटेडला २०१८ या वर्षीचा डिजिटल कंटेन्ट कंपनी आॅफ दी इयर - रिजनल पुरस्कार टॅलेन्ट ट्रॅक पुरस्कार सोहळ्यात प्रदान करण्यात आला होता. तसेच २०१७ व २०१८ या दोन्ही वर्षी झी मराठी कॉमेडी अ‍ॅवॉर्ड्स सोहळ्यात बेस्ट वेब सिरिजचा पुरस्कार मिळाला होता. सारंग साठ्ये, अनुषा नंदकुमार, पॉला मॅकग्लिन हे गुलबदन टॉकिज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संस्थापक संचालक आहेत.
यासंदर्भात लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे सहव्यवस्थापकीय व संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी सांगितले की, आपण बनवत असलेल्या कार्यक्रमाच्या आशयाविषयी इतकी सूक्ष्म जाण असणारे संचालक क्वचितच पाहायला मिळतात. गुलबदन टॉकिज प्रायव्हेट लिमिटेडचा जो मोठा भांडवली हिस्सा खरेदी केला आहे त्याचा उपयोग या कंपनीच्या विस्तारासाठी व अधिकाधिक
उत्तम कार्यक्रमांची निर्मिती करण्यासाठी केला जाईल. प्रादेशिक भाषांतील कार्यक्रमांचा आशय अत्यंत उत्तम असतो. गुलबदन टॉकिज प्रायव्हेट लिमिटेडशी केलेल्या या भागीदारीचा निर्णय जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे.
जगाच्या कानाकोपऱ्यातील कोट्यवधी मराठी प्रेक्षकांसाठी अतिशय आगळावेगळा आशय असलेल्या मराठी कार्यक्रमांची निर्मिती केली जाईल.
गुलबदन टॉकिजच्या संस्थापक संचालक व सीईओ पॉला मॅकग्लिन यांनी सांगितले की, लोकमतशी भागीदारी व्हावी असे अनेक दिवसांपासून आमच्या मनात होते. आमच्या कंपनीला एक वर्ष पूर्ण व्हायचे होते त्याआधीच लोकमत मीडियाशी आमचा पहिल्यांदा संपर्क झाला होता. आम्ही मराठीत नव्या पद्धतीने कार्यक्रमांची निर्मिती करत आहोत याबद्दल लोकमत मीडियाने आमचे नेहमीच कौतुक केले. आता आम्ही त्यांच्याबरोबरच काम करणार आहोत हा आनंदाचा क्षण आहे.

Web Title: Investments made by Lokmat Media in Gulabdan Talkies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Lokmatलोकमत