हेक्स वर्ल्ड प्रकल्पावर गुंतवणूकदारांची धडक
By admin | Published: August 29, 2016 06:13 AM2016-08-29T06:13:50+5:302016-08-29T06:13:50+5:30
खारघर सेक्टर ३५ मधील छगन भुजबळ यांच्या मालकीचा हेक्स वर्ल्ड हा प्रकल्प सुमारे ५ एकर परिसरात उभारण्यात येणार आहे.
पनवेल : खारघर सेक्टर ३५ मधील छगन भुजबळ यांच्या मालकीचा हेक्स वर्ल्ड हा प्रकल्प सुमारे ५ एकर परिसरात उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पात शेकडो ग्राहकांनी आपले पैसे गुंतविले आहेत. मात्र भूखंड घोटाळ्यातील गैरव्यवहारामुळे छगन भुजबळ यांचे विविध प्रकल्प जप्त करण्यात आले असून खारघरमधील प्रकल्पावर देखील जप्तीची टाच आली आहे. त्यामुळे प्रकल्पात गुंतवणूक करणारे हवालदिल झाले असून, रविवारी शेकडो ग्राहकांनी एकत्र येऊन कायदेशीर लढा देण्याचा निर्धार
केला आहे.
खारघरमधील रोहिंजन गावाजवळ सर्व्हे नंबर ९१, ९४, ९५, १००, १०२, १०३ याठिकाणी हा प्रकल्प उभारण्यात येणार होता. मात्र अनेक दिवसांपासून प्रकल्पाचे काम बंद आहे. हजारो ग्राहकांनी यात गुंतवणूक केली आहे. जवळपास १०० हून अधिक ग्राहक रविवारी या ठिकाणी जमलेले होते.
दुसऱ्याच्या गुन्ह्याची शिक्षा आम्ही भोगत असून आमचे पैसे परत मिळालेच पाहिजे, अशी मागणी प्रकल्पातील ग्राहकांनी केली असून त्यासाठी हेक्स वर्ल्ड होम बायर्स असोसिएशनची स्थापना करण्यात आली आहे. यापुढे कायदेशीर मार्गाने लढा देणार असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष लालासाहेब लोमरे यांनी सांगितले.
हेक्स वर्ल्ड प्रकल्पांतर्गत दोन हजारांपेक्षा जास्त सदनिका उभारल्या जाणार होत्या. बुकिंग करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाकडून ४ लाखापेक्षा जास्त रक्कम घेण्यात आली
होती. देविशा इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाने हा व्यवहार करण्यात आला. मानवतेच्या दृष्टीने शासनाने आमचा विचार करायला हवा, याकरिता मुख्यमंत्र्यांना देखील पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले. ईडीने या प्रकल्पावर
जप्ती आणली असली तरी या प्रकल्पात आमचा पैसा गुंतला आहे. सध्या आम्ही या प्रकल्पाचे मालक असल्याने हेक्स वर्ल्ड होम बायर्स असोसिएशनकडे ही जागा वर्ग करण्यात यावी, अशी मागणी ग्राहकांनी केली.
हेक्स वर्ल्डमध्ये गुंतवणूक करणारे बहुतांश ग्राहक मुंबई व उपनगरातील रहिवासी आहेत. आपली नोकरी- व्यवसाय सांभाळून त्यांना फसवणुकीच्या प्रकरणात लक्ष द्यावे लागत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वत: जातीने लक्ष घालून लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी ग्राहकांनी केली.