बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे ३.९५ लाख कोटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2020 07:11 AM2020-09-25T07:11:56+5:302020-09-25T07:12:10+5:30

बाजाराचा संवेदनशील निर्देशांक १११५ अंशांनी घसरला, तर निफ्टी १०,८०० अंशांच्या जवळ पोहोचला.

Investors lose Rs 3.95 lakh crore due to market slump | बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे ३.९५ लाख कोटींचे नुकसान

बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे ३.९५ लाख कोटींचे नुकसान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोविडच्या साथीची दुसरी लाट येण्याची भीती, त्यामुळे अर्थव्यवस्थांमध्ये सुधारणा न होण्याची शक्यता, विविध देशांच्या बँकांकडून आर्थिक पॅकेज न मिळाल्याने जगभरातील शेअर बाजारांमध्ये निराशेचे वातावरण दिसून आले. याचा परिणाम भारतामध्येही होऊन शेअर बाजारात मोठी घसरण झाली. बाजाराचा संवेदनशील निर्देशांक १११५ अंशांनी घसरला, तर निफ्टी १०,८०० अंशांच्या जवळ पोहोचला.

सेन्सेक्स : मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक १११४.८२ अंशांनी म्हणजेच २.९६ टक्क्यांनी खाली आला. तो ३६,५५३.६० अंशांवर बंद झाला.
निफ्टी : राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांक (निफ्टी) मध्येही ३२६.३० अंशांची घट होऊन तो १०,८०५.५५ अंशांवर बंद झाला.

घसरणीची चार कारणे
1. कोविडच्या साथीची दुसरी लाट
येण्याच्या शक्यतेमुळे अर्थव्यवस्था सुधारण्यात होणारा विलंब.
2. अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी उद्योगांना नव्याने पॅकेज देण्याबाबत न केलेली घोषणा.
3. जगभरात वाढत असलेले कोरोनाचे रुग्ण.
4. गुंतवणूकदारांकडून नफा कमविण्यासाठी सुरू असलेली प्रचंड विक्री.

रुपयाने गाठला तळ
जगभरात अमेरिकन डॉलरची मागणी वाढल्यामुळे डॉलर मजबूत झाला. परिणामी, गुरुवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ३२ पैशांनी घसरले. रुपयाने गेल्या महिनाभरातील तळ गाठला आहे. -वृत्त/अर्थचक्र

सोने-चांदीच्या दरामध्ये घसरण
सोने-चांदीच्या भावात सलग तिसऱ्या दिवशी घसरण होऊन गुरुवारी चांदीचे भाव तीन हजार रुपयांनी गडगडून ती ५८ हजार रुपये प्रतिकिलोवर आली. तीन दिवसांत चांदीत १० हजार रुपयांनी घसरण झाली आहे. गुरुवारी सोने २०० रुपयांनी घसरून ५० हजार १०० रुपये प्रतितोळ्यावर आले. -वृत्त/अर्थचक्र

Web Title: Investors lose Rs 3.95 lakh crore due to market slump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.