मंत्रालयात आता अदृश्य जाळ्या; आंदाेलकांच्या उड्या राेखणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 06:29 AM2023-09-28T06:29:35+5:302023-09-28T06:29:57+5:30
नवा फंडा : प्रत्येक मजल्यावरील व्हरांड्यात उभारणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मंत्रालयातील जाळीवर उड्या मारण्याचे वाढते प्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारने आता नवीन फंडा आणला आहे. कुणाला उडीच मारता येऊ नये म्हणून प्रत्येक मजल्यावरील व्हरांड्यात उभ्या अशा अदृश्य जाळ्या उभारण्याचे काम बुधवारपासून सुरू करण्यात आले.
मंत्रालयाच्या आतील बाजूस कोणत्याही मजल्यावरून उडी मारली तरी मृत्यू होऊ नये वा कोणी जखमीदेखील होऊ नये म्हणून खालच्या बाजूला आधीपासूनच जाळी लावण्यात आली आहे. त्यामुळे वरून कोणीही उडी मारली तरी जाळीत अडकून जखमी होत नाही. मात्र, उडीच मारता येणार नाही अशी व्यवस्था आता अदृश्य जाळीद्वारे केली जाणार आहे.
मंत्रालय सुरक्षेसाठी कंपनीला १.४३ कोटी रुपये
मंत्रालय सुरक्षा प्रकल्पांतर्गत मे. सेक्युटेक ऑटोमेशन इंडिया लि. या कंपनीला १ कोटी ४३ लाख रुपये अदा करण्यासाठीचा शासन निर्णय बुधवारी काढण्यात आला. या कंपनीला एकूण आठ कोटी रुपये अदा करण्यात येणार असून, ही त्यातील पहिल्या टप्प्याची म्हणजे २० टक्के रक्कम आहे.
अदृश्य जाळीचे वैशिष्ट्य काय?
nया अदृश्य जाळीला जोरात धडक देऊन ती तोडण्याचा प्रयत्न केला तरी ती तुटणार नाही.
nजवळपास अडीचशे ते तीनशे किलो वजनाचा भार आला तरी ही प्लास्टिकची जाळी तुटत नाही.
nएक चौरस फूट जाळीसाठी १८० रुपये खर्च येतो; ही जाळी लावण्याचे काम येत्या १५ दिवसांत पूर्ण करणार.