Rahul Gandhi Prakash Ambedkar ( Marathi News ) : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेली भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत दाखल झाली आहे. या यात्रेच्या समारोपाला रविवारी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथं इंडिया आघाडीची जाहीर सभा होणार आहे. या सभेला काँग्रेसचे देशभरातील अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार असून महाराष्ट्रातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील हजेरी लावणार आहेत. यामध्ये आता आणखी एका नावाची भर पडली असून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हेदेखील राहुल गांधींच्या व्यासपीठावर दिसणार आहेत.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रकाश आंबेडकरांना भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोप सभेचं निमंत्रण दिलं होतं. हे निमंत्रण प्रकाश आंबेडकर यांनी स्वीकारलं असून ते रविवारी होणाऱ्या जाहीर सभेला उपस्थित राहणार आहे. याबाबतची माहिती स्वत: प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या एक्स हँडलवर दिली आहे. एकीकडे वंचितच्या महाविकास आघाडीतील समावेशाबाबत अजूनही प्रश्नचिन्ह असताना प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधींच्या सभेचं निमंत्रण स्वीकारल्याने वंचित आघाडी अजूनही मविआबद्दल सकारात्मक असल्याचं दिसत आहे.
दरम्यान, मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांना मी राजगृह येथे भोजनासाठी निमंत्रित केलं आहे, अशी माहितीही प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे.
राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा
राहुल गांधी यांनी मागील वर्षी काढलेल्या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांनी यावर्षी पूर्वोत्तर भारतामधून भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात केली होती. देशातील विविध राज्यांमध्ये फिरून काही दिवसांपूर्वी ही यात्रा अखेरच्या टप्प्यात महाराष्ट्रामध्ये दाखल झाली. खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेचा १२ मार्चला महाराष्ट्रात प्रवेश झाला. मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात न्याय यात्रेची रविवारी सांगता सभा होणार आहे. या सभेला इंडिया आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित असतील व लोकसभा निवडणुकीचा शंखनाद फुंकला जाईल.