Join us

अपूर्ण कामांमुळे अपघातास आमंत्रण

By admin | Published: August 01, 2014 3:42 AM

सायन-पनवेल मार्गावर अपूर्ण असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होत आहे.

नवी मुंबई : सायन-पनवेल मार्गावर अपूर्ण असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होत आहे. सातत्याने पाऊस सुरुच असल्याने या रस्त्यांचे काँक्रीटीकरण रखडल्याने या मार्गांची कामे होऊ शकलेली नाहीत. त्यामुळे रहदारीत अडथळा निर्माण होत असून वाहतूकदारांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.सायन-पनवेल मार्गाच्या रुंदीकरणादरम्यान आवश्यक ठिकाणी नवे पूल उभारण्यात आले आहेत. या पुलांच्या माध्यमातून मार्गावर जंक्शनच्या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न झालेला आहे. मात्र नव्या पुलांचे काम पूर्ण होऊन ते रहदारीला खुले होऊनही त्याखालील रस्त्यांचे काम अद्यापही अपूर्णच आहेत. त्यामध्ये वाशी गाव, सानपाडा जंक्शन, उरण फाटा, कोपरा, कामोठा या ठिकाणांचा समावेश आहे. या ठिकाणी उभारलेले नवे पूल वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. परंतु जंक्शनला जोडणारे पुलाखालील मार्ग अद्यापही बंदच आहेत. त्यामुळे या ठिकाणाहून जाणाऱ्या वाहनांची वाहतूक कोंडी होत आहे. काही ठिकाणी मार्गाचे काम अपूर्ण असतानाही तेथूनच रहदारी सुरुच आहे. त्यामुळे वाहनांच्या अपघाताची शक्यताही निर्माण होत आहे. तर सानपाडा पूल, उरणफाटा येथे अनेक अपघात देखील झाले आहेत. उरणफाटा येथे अपूर्ण असलेल्या रस्त्याच्या कामामुळे वाहनचालकांची सर्वाधिक गैरसोय होत आहे. उरणफाटा जंक्शन हे उरण व जेएनपीटीच्या मार्गाला जोडणारा असल्याने या ठिकाणी मोठ्याप्रमाणात रहदारी होत असते. परंतु पुलांखालील रस्त्यांचे काँक्रीटीकरण अद्यापही सुरुच आहे. सातत्याने सुरु असलेल्या पावसामुळे ठेकेदाराकडून या कामाला गती मिळू शकलेली नाही. भरपावसात काँक्रीटीकरण केल्यास त्यात पाणी मिसळून कामाचा दर्जा ढासळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही कामे धीम्या गतीने केली जात आहेत. परिणामी अशा ठिकाणी वाहतुकीचा बोजवारा उडालेला आहे. पुलाखालील सुरु असलेल्या रस्त्यांची ही कामे पूर्ण होण्यास अद्याप एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता पीडब्ल्यूडीचे उपअभियंता हेमंत जगताप यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)