मुंबई - राज्यात गतवर्षी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणूक निकालानंतर शिवसेनेत राजकीय बंड निर्माण झालं. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात तब्बल ४० आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी फारकत घेत सरकारमधून बाहेर पडले. तर, १३ खासदारही शिंदेसोबत गेले. शिवसेनेत पडलेल्या या फुटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पदावरून पायउतार व्हावं लागले. या राजकीय घडामोडीनं शिवसेनेत वादळ आलं. तर, पक्षाच्या धनुष्यबाण चिन्हावरही गदा आली आहे. उद्धव ठाकरेंच्या जोडीला आदित्य ठाकरे मैदानात आहेतच. मात्र, आता तेजस ठाकरे यांनीही राजकीय मैदानात उतरण्यासाठी शिवसेना नेत्यांकडून आवाहन केलं जात आहे.
शिंदे यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांच्यासमोर पक्ष संघटना मजबूत करण्याचं आव्हान निर्माण झाले. त्यात आदित्य ठाकरे यांनी आक्रमकपणे पुढाकार घेतला. पण त्याचसोबत शिवसेनेत नवं नेतृत्व उदयास येण्याची चर्चा सुरु झाली. मुंबईच्या गिरगावात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी लावलेल्या बॅनर्सनं सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्या बॅनरची चर्चा सुरू असतानाच आता तेजस ठाकरेंनीराजकारणात यावं, असं थेट आवाहनचं शिवसेना प्रवक्ते आनंद दुबे यांनी केलं आहे.
क्रिकेटरचा मुलगा क्रिकेटर होऊ शकतो. आणि जर स्वत:च्या मनात राजकारणामध्ये समाजिक काम करण्यासाठी इच्छा आहे, तर कोणीही राजकारणात येऊ शकतो. जर तेजस ठाकरे राजकारणात आले तर आम्हाला त्याचा अभिमान वाटेल. एक युवा नेते म्हणून आदित्य ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून ते काम करतील. देशाच्या विकासामध्ये एक नवीन गती देणारं कोणी असेल तर त्याचे स्वागतच केले पाहिजे, असे आनंद दुबे यांनी म्हटले. तसेच, तेजस ठाकरे तुम्ही राजकारणात या, आणि महाराष्ट्राला एक समृध्द राज्य बनवा. अशी माझी इच्छा आहे, असेही दुबे यांनी म्हटले.