ओबामांनी दिले होते जैन यांना निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 05:39 AM2018-05-01T05:39:02+5:302018-05-01T05:39:02+5:30
राज्याचे मुख्य सचिव म्हणून सूत्रे स्वीकारलेले डी. के. जैन हे केंद्र सरकारमध्ये कार्यरत असताना, त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याने प्रभावित होऊन
मुंबई : राज्याचे मुख्य सचिव म्हणून सूत्रे स्वीकारलेले डी. के. जैन हे केंद्र सरकारमध्ये कार्यरत असताना, त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याने प्रभावित होऊन अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी चर्चेसाठी निमंत्रित केले होते. उत्तम प्रशासकीय अधिकारी असा जैन यांचा लौकिक आहे.
२५ जानेवारी १९५९ रोजी जन्मलेले जैन हे मूळचे राजस्थानातील जयपूरचे. एम.टेक. मॅकॅनिकल इंजिनीअर, एमबीए असे त्यांचे शिक्षण झाले आहे. राज्य शासनाच्या प्रशासनात त्यांनी आतापर्यंत महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यांची पहिली पदस्थापना १९८४ मध्ये धुळे येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून झाली. त्यानंतर, विविध ठिकाणी, विविध पदांवर त्यांनी काम पाहिले. यूएनआयडीओ नवी दिल्ली येथे राष्ट्रीय कार्यक्रम संचालक म्हणून २००२ मध्ये असताना, त्यांनी औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी विविध आॅटोमोबाइल्स कंपन्यांमध्ये प्रशिक्षण दिले, मॅन्युअल्स लिहिली. २००७ मध्ये राज्य शासनाच्या ग्रामविकास आणि जलसंधारण विभागाचे सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. २००८ ते २०११ या कार्यकाळात केंद्र शासनात पंचायत राज मंत्रालयाचे सहसचिव म्हणून त्यांनी काम केले आहे. जैन यांनी ‘नरेगा’मध्ये माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर केला. त्यांच्या कामाची दखल अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी घेतली होती आणि ओबामा यांनी त्यांना या संदर्भात निमंत्रण देऊन त्यांना चर्चेस
बोलाविले होते.
वाचनाची आवड
२०१५ मध्ये राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागांतर्गत माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर, कृषी व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून त्यांनी काही काळ काम पाहिले. २९ एप्रिल,२०१६ पासून ते वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहात होते. उत्तम प्रशासकीय अधिकारी अशी ओळख असलेले जैन यांना ट्रेकिंग आणि वाचनाची आवड आहे.