Join us

‘इंडिया’च्या मुंबईतील बैठकीसाठी २७ पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रण; तयारीला वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 6:30 AM

बैठकीचे यजमान पद उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : देशभरातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या मुंबईत ३१ ऑगस्ट रोजी होत असलेल्या बैठकीच्या तयारीला वेग आला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने या बैठकीसाठी देशभरातील २७ पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रणे पाठविली आहेत. पाच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसचे दिल्लीतील श्रेष्ठी आणि प्रादेशिक पक्षांचे प्रमुख नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.

बैठकीचे यजमान पद उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, राजदचे लालू प्रसाद यादव, जनता दल युनायटेडचे नितीश कुमार, तृणमूल काँग्रेसचे ममता बॅनर्जी, नॅशनल काॅन्फरन्सचे फारूख अब्दुल्लांसह सर्व नेते या बैठकीला येतील. शरद पवार यांनाही निमंत्रण दिले आहे. या बैठकीच्या निमित्ताने मुंबई, महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करताना पाहील, असेही राऊत म्हणाले.

दिल्लीत जागांवरून आप आणि काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या वादावर बोलताना ते म्हणाले, प्रत्येक राज्यात अनेक पक्ष आहेत. प्रत्येकाला विस्तार करण्याचा अधिकार आहे. जागा वाटपासाठी दोन्ही पक्ष बसून चर्चा करतील. मुंबईतील बैठकीसाठी आप आणि काँग्रेसला आमंत्रण दिले आहे. दिल्लीचे प्रकरण जुने आहे. पण, यावेळी कोणत्याही परिस्थितीत आप आणि काँग्रेस एकत्र निवडणूक लढवतील.

 

टॅग्स :संजय राऊतउद्धव ठाकरे