आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 09:10 AM2024-09-20T09:10:09+5:302024-09-20T09:10:39+5:30
वरळी मतदारसंघात यंदा मनसेकडून संदीप देशपांडे निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यमान आमदार आदित्य ठाकरेंना मोठं आव्हान काकांच्या पक्षाकडून निर्माण झालं आहे.
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेनं कंबर कसली आहे. राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा काढत ४ उमेदवारांची नावेही घोषित केली. मुंबईतही मनसे निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. त्यात वरळी मतदारसंघात मनसेचे नेते संदीप देशपांडे निवडणुकीत उभे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून देशपांडे यांचा वरळी मतदारसंघातील वावर वाढला आहे. यात मनसेनं 'व्हिजन वरळी' नावानं कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यात लोकांच्या समस्या, समस्येवर तोडगा आणि जनसंवाद घेतला जाणार आहे. मनसेनं या कार्यक्रमासाठी सर्वपक्षीयांसह स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांनाही निमंत्रण दिले आहे. त्यामुळे मनसेच्या व्हिजन वरळी या कार्यक्रमात आदित्य ठाकरे हजेरी लावणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे.
या कार्यक्रमाबाबत मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, गेल्या ३ महिन्यापासून सातत्याने आम्ही वरळी विधानसभेत फिरतोय, मत मागायला नाही तर मत जाणून घ्यायला आलोय असं कॅम्पेन केले. त्यात अनेक लोकांनी समस्या मांडल्या, तक्रारी दिल्या. या तक्रारी, समस्येवर अभ्यास करून, रिसर्च करून त्यावर काय तोडगा असू शकतो असा रिपोर्ट करून तो व्हिजन वरळीच्या माध्यमातून आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतोय. वरळीतल्या ज्या समस्या आहेत त्याचे आम्ही २-३ क्लस्टर तयार केलेत. त्यात तोडगे काय असतील ते मांडले जातील. एक जनसंवाद असेल त्यात आणखी काही सूचना असतील, सुधारणा काय आहेत ते देखील व्हिजन वरळीत असणार आहे.
तर मनसेची स्थापनाच महाराष्ट्राचं व्हिजन डोक्यात ठेवून राज ठाकरेंनी केली. त्याप्रकारे ते पुढे चाललेत. मनसेनं ब्लू प्रिंट आणली होती. त्यात समस्या, समस्येवर तोडगा मांडला होता. त्याचे अनेकांनी कौतुकही केले. वरळीत संदीप देशपांडे घरोघरी फिरतायेत. वरळीतील लोकांना ज्या समस्या भेडसावतायेत. त्या समस्यांचे निवारण कसं केले जाऊ शकते हे व्हिजन वरळीतून सादर होईल. वरळी विधानसभेत पहिल्यांदाच असा आगळावेगळा कार्यक्रम मनसेच्या माध्यमातून होतोय असं मनसे विभाग अध्यक्ष संतोष धुरी यांनी सांगितले.
दरम्यान, 'व्हिजन वरळी' या कार्यक्रमासाठी सर्व पक्षातील लोकांनी आपला अभिनिवेश बाजूला ठेवून वरळीच्या विकासासाठी काही सूचना असतील, काही गोष्टी सांगायच्या असतील तर सर्वांनी यावे. आम्ही सर्वपक्षीय लोकांना बोलवतोय. यात कुठलेही मतभेद नाहीत. हा प्रश्न लोकांच्या विषयांचा आहे त्यामुळे सर्वांनी यावे. स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांनाही आमंत्रण देऊ असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.