मुंबई : तापमानाचा पारा सतत वाढत असल्याने मुंबईकर हैराण आहेत. अशावेळी रस्त्यावरचे थंडपेय, बर्फाचा गोळ्यांसाठी गर्दी होताना दिसत आहे. परंतु हे पेय तयार करण्यासाठी बहुतांशी ठिकाणी दूषित पाण्याचा वापर केला जात आहे. याची गंभीर दखल घेऊन प्रत्येक विभागातील बर्फाचे गोळे विक्रेता आणि विशेषत: लिंबू सरबतच्या गाड्यांची झाडाझडती महापालिका घेत आहे. या मोहिमेत बहुतांशी ठिकाणी असलेले थंडपेय पिण्यास योग्य नसल्याचे समोर आले आहे.कुर्ला रेल्वे स्थानकावर तयार होत असलेल्या लिंबू सरबतबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावरून वायरल झाला होता. याची गंभीर दखल घेऊन पालिका प्रशासनाने सर्वच २४ विभागांमध्ये झाडाझडती घेण्याचे आदेश साहाय्यक आयुक्तांना देण्यात आले होते. या अंतर्गत महापालिकेने मुंबईतील दोनशे विक्रेत्यांकडून घेतलेल्या लिंबू सरबताची तपासणी केली होती. यामध्ये केवळ ४७ विक्रेत्यांकडील सरबत पिण्यास योग्य असल्याचे दिसून आले.गेल्या वर्षीही महापालिकेने घेतलेल्या नमुन्यांमध्ये ९८ टक्के ई कोलाय विषाणू आढळून आला होता. या वेळेसही दादर, भायखळा, कुर्ला, घाटकोपर, अंधेरी आणि वांद्रे रेल्वे स्थानकांवरील विक्रेत्यांकडून थंडपेय व पाण्याचे नमुने घेण्यात आले. त्यानुसार दूषित आढळून आलेले १५ हजार ६४५ किलो बर्फ आणि १० हजार लीटर थंडपेय फेकण्यात आले. पावसाळ्यापर्यंत ही कारवाई मुंबईभर अशीच सुरू राहणार आहे. मात्र नागरिकांनी रस्त्यावरील थंडपेय पिण्याचे टाळावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.
रस्त्यावरील शीतपेयांमुळे आजारांना आमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:43 AM