Join us

एनडीएत येण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडून आमंत्रण, माझा निर्णय दोन दिवसात कळवणार - नारायण राणे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2017 9:51 PM

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी  मुख्यमंत्र्यांनी एनडीएत येण्याबाबत विचारले, अशी माहिती नारायण राणे यांनी दिली. 

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी एनडीएत येण्याबाबत विचारलेमाझा निर्णय दोन दिवसात कळवणारशरद पवार यांचा आशिर्वाद घेऊनचं पक्षस्थापना

मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी  मुख्यमंत्र्यांनी एनडीएत येण्याबाबत विचारले, अशी माहिती नारायण राणे यांनी दिली. आज दिवसभर नारायण राणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची चर्चा सुरु होती. अखेर रात्री नऊ वाजताच्या सुमार नारायण राणे यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री आणि नारायण राणे यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. यानंतर नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एनडीएत येण्याबाबत विचारले. मात्र, माझा निर्णय दोन दिवसात त्यांना कळवणार आहे. दरम्यान, नारायण राणे स्वतः आपल्या आमदार मुलाला पक्षात घेऊ शकत नाहीत, अशी त्यांची अवस्था झाली आहे,  अशा शब्दांत शरद पवारांनी नारायण राणेंची खिल्ली उडवली. यावर बोलताना नारायण राणे म्हणाले की, शरद पवार यांचा आशिर्वाद घेऊनचं पक्षस्थापना केली आहे. त्यांनी अशी टीका करायला नको होती. दुसरीकडे, नारायण राणेंच्या नव्या पक्षाची धोरणं एनडीएसाठी अनुकूल असतील, तर त्यांचं एनडीएत स्वागत करु. असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोमवारी म्हटले होते. त्यामुळे नारायण राणे एनडीएत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

काय म्हणाले होते शरद पवार ?नव्याने राजकीय पक्ष स्थापन केलेले ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या भूमिकेबाबत प्रतिक्रिया विचारली असता पवारांनी नारायण राणेंची खिल्ली उडवली. 'नारायण राणे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांची काळजी घ्यायला हवी होती. आता निष्ठावान कार्यकर्ते सोडून गेले आहे. राणे यांचा पुत्र आमदार आहे. याशिवाय त्यांचे एक निष्ठावान सहकारी आमदार आहेत. मात्र ते त्यांना पक्षात घेऊ शकत नाहीत, अशी त्यांची अवस्था झालीये', असे पवार यावेळी म्हणाले.

टॅग्स :नारायण राणे